जम्मू-काश्मीरच्या सुंदरबनी सेक्टरमध्ये घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या दोन पाकिस्तानी घुसखोरांचा खात्मा करण्यात आला आहे. मात्र, त्यांच्यासोबत झालेल्या चकमकीमध्ये भारतीय लष्कराचे तीन जवानही शहीद झाले आहेत. तर अन्य एक जवान जखमी आहे. जखमी जवानाला उधमपूर येथील लष्करी रूग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.


मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आज दुपारी पावणे दोनच्या सुमारास सुंदरबनी सेक्टरजवळ नियंत्रण रेषा ओलांडून घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या दोन पाकिस्तानी घुसखोरांसोबत भारतीय लष्कराची चकमक उडाली होती. त्यांच्याकडे मोठ्याप्रमाणात दारुगोळा होता अशी माहिती आहे. घुसखोरांचा खात्मा केल्यानंतर त्यांच्याकडील दोन ए.के.47 आणि अन्य साहित्य ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे.