काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आता गुलाम नबी आझाद कोणतं पाऊल उलणार याकडे सर्वांच लक्ष लागलं होतं. मागील काही दिवसांपासून ते जम्मू काश्मीर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान आयोजित सभेत त्यांनी नवीन राजकीय पक्ष स्थापन करणार असल्याची घोषणा केली होती. त्यामुळे आता आझाद त्यांचा नव्या पक्षाची घोषणा कधी करणार याची सगळ्यांना उत्सुकता असताना, आज (११ सप्टेंबर) बारामुल्ला येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना आझाद यांनी येत्या दहा दिवसांमध्ये नव्या पक्षाची घोषणा करणार असल्याचे जाहीर केले आहे. जम्मू-काश्मीरच्या लोकांच्या सूचनेनुसार पक्षाचे नाव दिले जाईल, असे ते म्हणाले आहेत.

अद्याप नवीन पार्टीचं नाव ठरवलेलं नाही. मात्र, काश्मीरची जनताच पक्षाचं नाव आणि चिन्ह ठरवतील असंही त्यांनी या अगोदर सांगितलं होतं. तर, ते भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा देखील यापूर्वी रंगली होती.

काँग्रेसने माझ्यावर क्षेपणास्त्र डागले, मी फक्त 303 रायफलने प्रत्युत्तर दिले – गुलाम नबी आझाद

दरम्यान काल एका जाहीर सभेला संबोधित करताना गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसवर निशाणा साधला, “त्यांनी माझ्यावर क्षेपणास्त्रे डागली, मी फक्त 303 रायफल्सने प्रत्युत्तर दिले आणि त्यांना नष्ट केले. मी जर बॅलेस्टिक क्षेपणास्त्र वापरले असते तर मग काँग्रेस अजिबात दिसली नसती. मी ५२ वर्षांपासून पक्षाचा (काँग्रेस) सदस्य होतो आणि राजीव गांधींना माझा भाऊ आणि इंदिरा गांधींना माझी आई मानतो. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध शब्द वापरण्याची माझी इच्छा नाही.”असे त्यांनी म्हटले.

Story img Loader