जम्मू-काश्मीरमध्ये संक्षयास्पद ड्रोन्स आढळून येण्याच्या घटना सुरुच आहेतच. गुरुवारी रात्री जम्मू-काश्मीरमधील सांबा जिल्ह्यामधील वेगवेगळ्या ठिकाणी संशयास्पद पाकिस्तानी ड्रोन्स उडताना दिसून आले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी रात्री साडेआठ ते साडेऊनच्या सुमारास बारी-ब्राह्मणा, चिलाद्या आणि गगवाल या परिसरांमध्ये एकाच वेळी हे ड्रोन्स दिसले. यापैकी दोन ड्रोन्स लष्करी छावणीजवळ तर एक इंडियो तिबेटीयन पोलीस म्हणजेच आयटीबीपीच्या छावणीजवळ दिसून आला. सुरक्षादलाच्या जवानांनी या ड्रोन्सवर गोळीबार केल्यानंतर हे ड्रोन्स या ठिकाणाहून निघून गेले.
नक्की वाचा >> समजून घ्या : ड्रोन हल्ला म्हणजे काय?, तो रोखता येतो का?; कोणत्या देशांकडे आहे ‘Anti Drone System’?
धक्कादायक बाब म्हणजे एका आठवड्यापूर्वी कनचक परिसरामध्ये पोलिसांनी एक ड्रोन पाडलं होतं. हे ड्रोन स्फोट घडवून आणणारं पाच किलो आयईडी सामान घेऊन जात असल्याचं नंतर स्पष्ट झालं होतं. हे पाकिस्तानी ड्रोन होतं. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांनी पाकिस्तानच्या दिशेने परतणाऱ्या ड्रोन्सवर चिलाद्या परिसरामधून गोळीबार केला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अन्य दोन डोन्स बारी ब्राह्मणा आणि गगवालमध्ये जम्मू-पठाणकोट राष्ट्रीय महामार्गाला लागून असणाऱ्या संरक्षण दलांच्या तळांजवळील संवेदनशील परिसरात फिरत होती. मात्र काही कारवाई करण्याआधीच ही ड्रोन्स दिसेनाशी झाली.
Jammu & Kashmir | Drone activities were suspected at three different areas of Samba district, last night, says SSP Samba Rajesh Sharma
Visuals from Ghagwal area of Samba pic.twitter.com/J4CLLj3RGe
— ANI (@ANI) July 30, 2021
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांबरोबरच अन्य सुरक्षा दलांकडूनही या घटनास्थळांचा कसून तपास करण्यात येणार आहे. मागील शुक्रवारी जम्मू-काश्मीरमधील कनचक परिसरामध्ये पहाटेच्या वेळेस ड्रोन दिसलं होतं. हे ड्रोन जम्मू-काश्मीर पोलिसांनी गोळीबार करुन पाडलं होतं. या ड्रोन्ससंदर्भातील तपास सुरु असतानाच गुरुवारी पुन्हा तीन ड्रोन्स दिसल्याने चिंता व्यक्त केली जातेय.
या दोन ड्रोन्ससोबतच प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ पुंछ सेक्टरमध्ये पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्स असं लिहिलेला एक फुगा सापडलाय. यावर पाकिस्तानचाही झेंडा देखील आहे. जम्मू-काश्मीरमध्ये २७ जून रोजी भारतीय वायूसेनेच्या स्टेशनवर झालेल्या हल्ल्यामध्ये ड्रोन्सचा वापर करण्यात आल्यापासून वारंवार भारतीय सीमेवजळ ड्रोन्स दिसून येत आहेत. मागील काही आठवड्यांमध्ये याचं प्रमाण फार वाढलं आहे. २७ जून रोजी भारताच्या आंतरराष्ट्रीय सीमेपासून १४ किलोमीटरवर असणाऱ्या भारतीय हवाई दलाच्या तळावर ड्रोन्सच्या मदतीने स्फोटके टाकून हा हल्ला करण्यात आला. त्यानंतर रातनुचाक—कालुचाक लष्करी भागात रविवारापासून बुधवारपर्यंत म्हणजेच २७ जून २०२१ पासून ३० जून २०२१ पर्यंत सलग चार दिवस या भागांमध्ये ड्रोन्सचा वावर दिसून आला होता.