जम्मू-काश्मीरच्या विषयावर वादग्रस्त विधान केले म्हणून हसीब द्राबू यांना राज्याच्या अर्थमंत्रीपदावरुन हटवण्यात आले आहे. जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी द्राबू यांचा राजीनामा घेतला आहे. काश्मीर समस्या राजकीय मुद्दा नसून तो एक सामाजिक विषय आहे असे विधान द्राबू यांनी रविवारी दिल्लीत एका कार्यक्रमात केले होते. हसीब द्राबू यांना मंत्रिमंडळातून हटवण्यात येत असल्याचा निर्णय राज्य सरकारने राज्यपाल एन.एन.व्होरा यांना कळवला आहे.
हसीब द्राबू हे पीडीपीचे वजनदार नेते म्हणून ओळखले जातात. जम्मू-काश्मीरमध्ये सध्या भाजपा-पीडीपी आघाडीचे सरकार आहे. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्याबद्दल पीडीपीने द्राबू यांना नोटीसही बजावली होती. द्राबू यांनी त्यांचे विधान तात्काळ मागे घ्यावा असे पक्षाकडून त्यांना सांगण्यात आले होते. काश्मीर हा पीडीपीसाठी राजकीय मुद्दा असून तो पक्षासाठी अत्यंत महत्वाचा विषय आहे असे मदनी यांनी सांगितले. पीडीपीचे उपाध्यक्ष सरताज मदनी यांनी त्यांना स्पष्टीकरण द्यायला सांगितले होते.
२०१५ साली जम्मू-काश्मीरमध्ये भाजपा-पीडीपी आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर हसीब द्राबू यांना राज्याचे अर्थमंत्री बनवण्यात आले. २००५ ते २०१० दरम्यान जम्मू-काश्मीर बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारीपद भूषवलेल्या द्राबू यांनी अर्थमंत्री म्हणून अनेक महत्वाचे निर्णय घेतले. द्राबूंच्या कार्यकाळातच जम्मू-काश्मीरमध्ये जीएसटी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला.