जम्मू-काश्मीरमध्ये माजी मुख्यमंत्र्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) च्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती यांनी मंगळवारी मतमोजणी सुरू असतानाच आपापल्या लोकसभा मतदारसंघातून पराभव स्वीकारला. काश्मीरमधील निकालांनी येथील घराणेशाहीचा अंत झाल्याचे संकेत दिले आहेत. यंदा जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या ३५ वर्षांतील सर्वाधिक मतदान झाले होते.
निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, बारामुल्ला लोकसभा मतदारसंघात तुरुंगात असलेले माजी आमदार शेख अब्दुल रशीद उर्फ इंजिनीअर रशिद यांनी माजी मुख्यमंत्री अब्दुल्ला यांचा पराभव केला. तर माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनीही अनंतनाग-राजौरी लोकसभा जागेवरील पराभव स्वीकारला. नॅशनल कॉन्फरन्सचे गुर्जर नेते मियां अल्ताफ यांनी त्यांचा मोठ्या फरकाने पराभव केला.
हेही वाचा : भाजपला तारणारे ‘एनडीए’तील दोन बाबू
प्रतिष्ठित श्रीनगर लोकसभा मतदारसंघात नॅशनल कॉन्फरन्सचे नेते आगा रुहुल्ला मेहदी यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार आणि पीडीपीचे युवा अध्यक्ष वाहीद पारा यांचा पराभव केला.आपनी पार्टीला त्याचेे खाते उघडता आले नाही. पक्षाचे संस्थापक अल्ताफ बुखारी म्हणाले की, त्यांचा पक्ष आत्मपरीक्षण करण्यासाठी, त्यांच्या चुकांमधून शिकण्यासाठी आणि पक्ष मजबूत व अधिक लवचिक बनण्यासाठी या संधीचा उपयोग करेल.
जम्मू मतदारसंघ राखण्यात भाजपला यश
जम्मू मतदार संघात भाजपच्या जुगल किशोर यांनी काँग्रेसच्या रमण भल्ला यांचा पराभव केला तर उधमपूर मतदार संघात भाजपचे उमेदवार डॉ. जितेंद्र सिंग यांनी काँग्रेसच्या छ. लाल सिंग यांचा पराभव केला.
हेही वाचा : बंगाली अस्मिता वरचढ! पश्चिम बंगालमध्ये भाजपचा हिंदुत्वाचा प्रयोग अपयशी
मुलाने केलेल्या प्रचाराचा फायदा
कुपवाडा जिल्ह्यातील लंगेट विधानसभा क्षेत्रातील ५६ वर्षीय माजी आमदार रशिद यांना २०१९ मध्ये अटक करण्यात आली होती. दहशतवादविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झालेले ते पहिले मुख्य प्रवाहातील राजकारणी होते. त्यांचा प्रचार त्यांचा मुलगा अबरार याने केला होता.
उत्तर काश्मीरमधील विजयाबद्दल इंजिनीअर रशिद यांचे अभिनंदन. मतदारांनी आवाज उठवला आहे आणि लोकशाहीत हेच महत्त्वाचे आहे. – ओमर अब्दुल्ला
लडाखमध्ये अपक्षाची सरशी
लडाख लोकसभा मतदारसंघ भाजपने गमावला आहे. तिथे अपक्ष उमेदवार मोहम्मद हनीफा यांनी काँग्रेसचे उमेदवार त्सेरिंग नामग्याल यांचा पराभव केला. तर भाजपच्या ताशी ग्याल्सन तिसऱ्या स्थानी राहिले.