जम्मू काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत भारतीय सुरक्षा दलाचा एक जवान शहीद झाला आहे, तर अन्य तीन जवान जखमी झाले आहेत. किश्तवाडमधील कुंतवारा व केशवान या भागातील घनदाट जंगलात दोन दहशतवादी लपले असल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. त्यानुसार, भारतीय सुरक्षा दल व जम्मू काश्मीर पोलीसांकडून संयुक्तपणे शोधमोहीम राबवण्यात आली. शोधमोहीमेवेळी दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत नायब सुभेदार राकेश कुमार हे शहीद झाले, तर अन्य तीन जवान जखमी झाले आहेत. भारतीय सुरक्षा दलाच्या ‘व्हाईट नाईट कॉर्प्स’ या अधिकृत एक्स (ट्विटर) खात्यावरून याबाबत माहिती देण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शोधमोहीम सुरू असताना दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत नायब सुभेदार राकेश कुमार व अन्य तीन जवान जखमी झाले होते. चौघांना उपचारांसाठी उधमपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, उपचार सुरू असताना राकेश कुमार यांची प्राणज्योत मालवली, तर अन्य तीन जखमी जवानांवर सध्या उपचार सुरू आहेत. राकेश कुमार हे २ पॅरा एसएफमध्ये (स्पेशल फोर्सेस) कार्यरत होते. दहशतवाद्यांनी केलेल्या ह्या भ्याड हल्ल्यानंतर सुरक्षा दल व जम्मू काश्मीर पोलिसांकडून घटनास्थळी व्यापक स्वरुपात शोधमोहीम सध्या सुरू आहे. जवानांवर हल्ला झाला त्या ठिकाणाहून काही अंतरावरच काल (९ नोव्हेंबर) ग्राम संरक्षण दलातील दोन जवानांचे मृतदेह आढळून आले होते. ग्राम संरक्षण दलातील नाझिर अहमद व कुलदीप कुमार या दोन जवानांचे दहशतवाद्यांनी अपहरण केले होते. त्यानंतर दोघांची हत्या केली. जैश-ए-मोहम्मदचा गट काश्मीर टायगर्सने या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. या हत्येत दोन दहशतवाद्यांचा सहभाग असल्याची शक्यता वर्तवली जात असून त्यांचा शोध सध्या सुरू आहे.

हेही वाचा : Railway Worker Crushed : एक्स्प्रेस पुढे जाण्याऐवजी मागे आली अन् रेल्वे कर्मचारी चिरडला; बिहारमध्ये भीषण अपघात!

भारतीय लष्कराच्या ‘व्हाईट नाईट कॉर्प्स’ने दिलेल्या माहितीनुसार किश्तवाड जिल्ह्यातील भरत रिज या भागात भारतीय सुरक्षा दलाकडून शोधमोहीम राबवण्यात आली होती. त्यावेळी दहशतवाद्यांशी उडालेल्या चकमकीत नायब सुभेदार राकेश कुमार यांनी सर्वोच्च बलिदान दिले. ‘व्हाईट नाईट कॉर्प्स’कडून राकेश कुमार यांच्या कुटुंबियांप्रति संवेदना व्यक्त करण्यात आल्या आहेत. दरम्यान, ८ नोव्हेंबर रोजी बारामुल्ला येथे सुरक्षा दल व दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली होती. त्यात भारतीय सुरक्षा दलाच्या जवानांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते. जम्मू विभागातील राजौरी, पूंछ, रियासी, उधमपूर, डोडा आणि कठुआ या जिल्ह्यांसह किश्तवाडमध्ये या वर्षी दहशतवादी हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jammu kashmir kishtwar district encounter soldier killed three commandos injured css