जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी महात्मा गांधींबाबत एक वादग्रस्त विधान केलं आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याकडे कोणतीही पदवी नव्हती, असं ते म्हणाले. सिन्हा यांचं हे विधान चांगलंच चर्चेत असून यासंदर्भातील व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो आहे. दरम्यान, काँग्रेसनेही या विधानावरून खोचक शब्दांत टीका केली आहे.
हेही वाचा – “…तर ते म्हणतील, मी तुमच्या पाठीवर नाक पुसतोय”, राहुल गांधी माध्यमांवर संतापले
इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, शुक्रवारी ग्वाल्हेरच्या आईटीएम विद्यापीठात डॉ. राम मनोहर लोहिया यांच्या स्मृतीपित्यर्थ व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी नायब राज्यपाल मनोज सिन्हा हे विद्यार्थ्यांना, ‘केवळ पदवी मिळवणे म्हणजे शिक्षण मिळवणे नाही’ हे समजवण्याच प्रयत्न करत होतो. ते म्हणाले, आपल्यापैकी अनेकांना वाटतं की गांधीजींकडे कायद्याची पदवी होती. मात्र, हे खरं नाही. त्यांच्याकडे कोणतीही पदवी नव्हती. त्यांचं शिक्षण केवळ हायस्कूलपर्यंत झालं होतं. पण ते अशिक्षित होते असं कोणीही म्हणणार नाही. त्यांच्याकडे कायद्याची पदवी नसली तरी कायद्याचा अभ्यास करण्याची त्यांची पात्रात होती. शिक्षण कमी असतानाही ते राष्ट्रपिता झाले. त्यामुळे केवळ पदवी घेणे म्हणजे शिक्षण घेणे असं होत नाही.
दरम्यान, मनोज सिन्हा यांच्या या विधानावर काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. मध्य प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष कमलनाथ यांचे मीडिया सल्लागार पीयूष बबेले यांनी मनोज सिन्हा यांच्यावर खोचक शब्दांत टीका केली आहे. जेव्हापासून पंतप्रधान मोदी आणि स्मृती इराणी यांच्या पदवीवर प्रश्न उपस्थित करण्यात येतोय, तेव्हापासून भाजपासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. महात्मा गांधी हे बॅरिस्टर होते. तुमच्या वादात त्यांना का ओढताय?, असं ते म्हणाले.