पीटीआय, श्रीनगर
जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा शनिवारी शिया समुदायाच्या मोहरम मिरवणुकीत सहभागी झाले. श्रीनगर शहरातील अंतर्गत भागात पारंपरिक मार्गाने ही मिरवणूक काढण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. गेल्या ३५ वर्षांत येथे प्रथमच एखाद्या राज्य प्रमुखाने मोहरमच्या मिरवणुकीत भाग घेतला.
प्रशासनाने गुरुवारी आठव्या दिवशी मोहरमच्या मिरवणुकीला ३४ वर्षांत प्रथमच श्रीनगरच्या गुरुबाजार ते दलगेट या पारंपरिक मार्गाने जाण्यास परवानगी दिली. शनिवारी निघालेल्या मोहरमच्या आशुरा दिन मिरवणुकीत जडीबल-बोटा कादल येथे मनोज सिन्हा सहभागी झाले. त्यांनी काळा कुर्ता परिधान केला होता. पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता. पोलीस आणि नागरी प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी या वेळी उपस्थित होते. सिन्हा यांनी मिरवणुकीतील अन्य लोकांशी संवाद साधला. त्यांना अल्पोपहाराचे वाटप केले.
अतिरिक्त पोलीस महासंचालक विजयकुमार यांनी सांगितले, की, या वेळी कडेकोट सुरक्षा होती. नायब राज्यपालांनी संबंधितांना दिलेल्या आश्वासनानुसार ते या मिरवणुकीत सहभागी झाले. त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह अभिवादन करून आदरांजली वाहिली. हा एक चांगला संकेत आहे. लष्कराने सुरक्षा स्थिती सुधारण्यास मदत केली असली तरी शांतता राखण्याचे मोठे श्रेय येथील जनतेचेच आहे.