पीटीआय, चंडिगढ/श्रीनगर

नॅशनल कॉन्फरन्स विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी ओमर अब्दुल्ला यांची गुरुवारी निवड करण्यात आली. आता नॅशनल कॉन्फरन्सच्या मित्रपक्षांची शुक्रवारी बैठक होईल. त्यात सरकार स्थापनेची औपचारिकता पूर्ण केली जाईल. तर हरियाणात दसऱ्यानंतरच भाजपचे नवे सरकार सत्तारूढ होईल. मंत्रिमंडळ निवडीत विभाग तसेच जातींचे संतुलन राहावे यासाठी व्यापक चर्चा सुरू असल्याचे सांगण्यात आले.

नॅशनल कॉन्फरन्सच्या आमदारांची पक्षाच्या मुख्यालयात बैठक झाली. ९५ सदस्यीय जम्मू-काश्मीर विधानसभेत नॅशनल कॉन्फरन्सला ४२ जागा मिळाल्या आहेत. तर त्यांचे मित्रपक्ष काँग्रेस ६ तर माकपला एक जागा मिळाली.

हेही वाचा : रतन टाटा यांना भावपूर्ण निरोप, अंत्यदर्शनासाठी सर्वसामान्यांची रीघ

सैनीच पुन्हा मुख्यमंत्री?

हरियाणाचे मुख्यमंत्री नायबसिंह सैनी यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांची दिल्लीत भेट घेतली होती. सैनी यांच्याकडेच पुन्हा मुख्यमंत्रीपद सोपवले जाईल अशी चिन्हे आहेत. गुरुवारी सैनी यांनी भाजपचे हरियाणा प्रभारी धर्मेंद्र प्रधान यांची दिल्लीत भेट घेतली. सैनी यांच्याकडे मार्चमध्ये राज्याची धुरा सोपविण्यात आली होती. निवडणूक जिंकल्यास सैनी हेच मुख्यमंत्री असतील असे पक्षाने नमूद केले होते. ९० सदस्यीय हरियाणा विधानसभेत भाजपने ४८ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले.

सध्याच्या सरकारमधील १० पैकी ८ मंत्री पराभूत झाले आहेत. महिपाल धंडा व मूलचंद शर्मा हे दोघेच विजयी झाले. धंडा हे जाट समुदायातून येतात. तर ज्येष्ठ नेते असलेले शर्मा हे पक्षाचा ब्राह्मण चेहरा मानला जातो. त्यांचे मंत्रीपद निश्चित मानले जाते. राज्यातील १७ राखीव जागांपैकी भाजपने ८ ठिकाणी यश मिळवले. ज्येष्ठ नेते कृष्णलाल शर्मा हे मंत्रीपदाचे प्रबळ दावेदार आहेत. दक्षिण हरियाणातील अहिरवाल पट्ट्यात भाजपने ११ पैकी १० जागा जिंकल्या. येथे केंद्रीय मंत्री राव इंद्रजित सिंह यांचे प्राबल्य आहे. त्यांची कन्या आरती यांना मंत्रीपद मिळेल अशी शक्यता आहे.