Jammu Kashmir News : गेल्या काही महिन्यांपासून जम्मू-काश्मीरमध्ये सातत्याने दहशतवादी हल्ल्याच्या घटना घडत असल्याचं समोर येत आहे. आता कठुआ जिल्ह्यात रविवारी (२३ मार्च) संध्याकाळी दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाल्याची माहिती समोर आली आहे. कठुआतील हिरानगर सेक्टर परिसरातील भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवरील सान्याल गावात संशयास्पद हालचाली आढळून आल्या. यानंतर सुरक्षा दलांनी शोध मोहीम सुरु केली.
यावेळी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाल्याची माहिती सांगण्यात येत आहे. तसेच सुरक्षा दलांनी काही दहशतवाद्यांना सर्व बाजूंनी घेरल्याचंही सांगितलं जात आहे. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, घटनास्थळी अधिक सैन्य पाठवण्यात आलं असून अधिक माहितीची प्रतीक्षा आहे. रविवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास पोलीस आणि सैन्य आणि सीआरपीएफचे संयुक्त पथकाने कठुआतील हिरानगर सेक्टर परिसरात मोठी शोध मोहिम राबवली. यावेळी दहशतवाद्यांनी गोळीबार सुरु केला. त्या गोळीबाराला सुरक्षा दलांच्या जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं.
कठुआच्या दुर्गम गावात दहशतवादी घुसल्याने जवानांनी घेराबंदी केल्याने चकमक झाली. कठुआ जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांच्या गटात झालेल्या चकमकीत एक अल्पवयीन मुलगी जखमी झाली असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तिची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं जात आहे. या संदर्भातील वृत्त न्यूज १८ ने दिलं आहे.
दरम्यान, सुरुवातीच्या गोळीबारानंतर दहशतवादी त्या ठिकाणाहून पळून जाण्यात यशस्वी झाल्याचं सागितलं जात आहे. यानंतर दहशतवाद्यांची शोध मोहीम सुरक्षा दलांच्या जवानांकडून सुरु करण्यात आली आहे. तसेच ही मोहीम उद्या आणखी तीव्र केली जाईल, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. तसेच जम्मू आणि काश्मीर पोलिसांच्या विशेष ऑपरेशन्स ग्रुप, लष्कर आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या पथकांनी हिरानगर येथील जंगलाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात शोध मोहीम सुरू केली आहे.