केंद्र सरकारने कलम ३७० रद्द केल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच लोकसभेची निवडणूक पार पडली. जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल काॅन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी लोकसभा निवडणुकीत पराभव मान्य केला आहे. ओमर अब्दुल्ला यांनी बारामुल्ला लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत अपक्ष उमेदवार अब्दुल राशिद शेख (राशिद इंजिनिअर) यांनी तब्बल १ लाख ३४ हजार ७०५ मतांनी आघाडी घेतली आहे. त्यामुळे बारामुल्ला लोकसभा निवडणुकीचा अंतिम निकाल अद्याप जाहीर झाला नसला तरी ओमर अब्दुल्ला यांनी पराभव मान्य करत अपक्ष उमेदवार अब्दुल राशिद शेख यांचं अभिनंदन केलं आहे.
बारामुल्ला लोकसभेत विजयाच्या जवळ असलेले राशिद इंजिनियर हे सध्या तिहार तुरुंगात आहेत. त्यांच्यावर यूएपीए अंतर्गत गुन्हा दाखल असून ते कारावासाची शिक्षा भोगत आहेत. राशिद इंजिनियर यांच्या दोन मुलांनी लोकसभा निवडणुकीसाठी बारामुल्ला मतदारसंघात जोरदार प्रचार केला होता. ओमर अब्दुल्ला यांनी राशिद इंजिनिअर यांचा मान्य करत त्यांचं अभिनंदन करणारी पोस्ट एक्सवर सामायिक केली आहे. ओमर अब्दुल्ला म्हणाले, “पराभव मान्य करण्याची वेळ आली आहे. राशिद इंजिनिअर यांनी उत्तर काश्मीरमध्ये मिळवलेल्या विजयाबद्दल त्यांचं अभिनंदन. राशिद इंजिनिअर यांच्या विजयाने त्यांची तुरुंगातून लवकर सुटका होईल असं मला वाटत नाही. तसंच उत्तर काश्मीर मधील जनतेला अपेक्षित असलेलं प्रतिनिधत्व देखील मिळणार नाही. पण लोकशाहीत मतदारच बोलतात.”
I think it’s time to accept the inevitable. Congratulations to Engineer Rashid for his victory in North Kashmir. I don’t believe his victory will hasten his release from prison nor will the people of North Kashmir get the representation they have a right to but the voters have…
— Omar Abdullah (@OmarAbdullah) June 4, 2024
दरम्यान, जम्मू काश्मीर मधील लोकसभेच्या पाच जागांसाठी पाच टप्प्यांमध्ये मतदान झालं होतं. बारामु्ल्ला लोकसभेसाठी पाचव्या टप्प्यात २० मे रोजी मतदान झालं होतं.