JK Pahalgam Terror Attack : जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात किमान २६ जणांचा मृत्यू झाला असून अनेक पर्यटक जखमी झाले आहेत. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जखमींपैकी दोन जणांची प्रकृती गंभीर आहे. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, दहशतवाद्यांना बैसरन येथे पर्यटकांवर बेछूट गोळीबार केला. या घटनेनंतर जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दरम्यान या हल्ल्यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या हल्ल्याचा निषेध व्यक्त करत यासाठी जबाबदार असणाऱ्यांना कठोर शिक्षा दिली जाईल असे म्हटले आहे. जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याने मी व्यथित झालो आहे. मृतांच्या कुटुंबियांच्या दु:खात मी सहभागी आहे. या भ्याड दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्यांना माफ केले जाणार नाही आणि त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल आणि त्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील, असे अमित शाह म्हणाले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे.“जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो. हल्ल्यात ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांच्याप्रती मी संवेदना व्यक्त करतो. जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत अशी मी प्रार्थना करतो. पीडितांना सर्वतोपरी मदत केली जात आहे. या घृणास्पद कृत्यामागे सहभागी आहेत त्यांना सोडणार नाही! त्यांचा दुष्ट अजेंडा कधीही यशस्वी होणार नाही. दहशतवादाविरुद्ध लढण्याचा आमचा निर्धार अढळ आहे आणि तो आणखी बळकट होईल” असे पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत.

तसेच त्यांनी या घटनेबद्दल पंतप्रधान मोदी यांनी माहिती दिल्याचेही म्हटले आहे. तसेच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबंधित अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतली असूनसर्व एजन्सींबरोबर तातडीची सुरक्षा आढावा बैठक घेण्यासाठी लवकरच श्रीनगरला रवाना होणार असल्याचेही अमित शाह यांनी सांगितले आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे बैसरन येथे फक्त पायी जाता येते, हे एक अत्यंत प्रसिद्ध पर्यटन स्थळ असून येथे पर्यटक मोठ्या संख्येने गर्दी करतात. घटनेनंतर लगेचच, पोलिसांचे एक पथक लष्कर आणि निमलष्करी दलांसह घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पर्यटकांना येथून काढले आणि हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी शोध मोहीम सुरू केली.

या वर्षी पर्यटकांवर झालेला हा पहिलाच दहशतवादी हल्ला आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात अतिरेक्यांनी पर्यटकांवर शेवटचा हल्ला केला होता, ज्यामध्ये दोन पर्यटक जखमी झाले होते. ती घटना देखील पहलगाममध्ये घडली होती.