Jammu Kashmir Pahalgam terror attack PM Modi Call to Amit Shah : जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथील बैसरन पर्वतावर फिरायला गेलेल्या पर्यटकांच्या गटावर दहशतवाद्यांकडून बेछूट गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली आहे. दरम्यान या दहशतवादी हल्ल्याबद्दल मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या दहशतवादी हल्ल्यात किमान २० जणांचा मृत्यू झाला आहे , तर १० जण जखमी असून दोन जणांची प्रकृती नाजूक असल्याची माहिती मिळत आहे. मीडिया रिपोर्टनसार हा दहशतवादी हल्ला मंगळवारी दुपारी २.३० वाजता झाला.

दरम्यान पहलगाम येथे झालेल्या या दहशतवादी हल्ल्याची देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील दखल घेतली आहे. या दहशतवादी हल्ल्याबाबत पंतप्रधान मोदींनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी फोनवरून संवाद साधला आणि त्यांना आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट करत भावना व्यक्त केल्या आहेत. “जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो. हल्ल्यात ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांच्याप्रती मी संवेदना व्यक्त करतो. जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत अशी मी प्रार्थना करतो. पीडितांना सर्वतोपरी मदत केली जात आहे. या घृणास्पद कृत्यामागे सहभागी आहेत त्यांना सोडणार नाही! त्यांचा दुष्ट अजेंडा कधीही यशस्वी होणार नाही. दहशतवादाविरुद्ध लढण्याचा आमचा निर्धार अढळ आहे आणि तो आणखी बळकट होईल” असे पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या सौदी अरेबियाच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. यादरम्यान त्यांनी जम्मू काश्मीर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याबद्दल गृहमंत्र्यांशी फोनवरून चर्चा केली. तसेच या संभाषणादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांना घटनास्थळाला भेट देण्यासही सांगितले आहे.

अमित शाह श्रीनगरला जाणार

गृहमंत्री अमित शाह यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत दहशतवादी हल्ल्याच्या घटनेमुळे व्यथित झाल्याची भावना व्यक्त केली आहे. “जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याने व्यथित झालो आहे. मृतांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. या भ्याड दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्यांना सोडले जाणार नाही आणि त्यांच्याविरोधात कठोर कारवाई केली जाईल आणि त्यांना परिणाम भोगावे लागतील,” असे अमित शाह यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या घटनेबद्दल माहिती दिली आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबंधित अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतली. सर्व यंत्रणांबरोबर तातडीची सुरक्षा आढावा बैठक घेण्यासाठी लवकरच श्रीनगरला रवाना होणार आहे,” असेही अमित शाह म्हणाले आहेत.