काश्मीरी जनतेने नरेंद्र मोदींच्या सुशासन आणि विकासाच्या राजकारणाच्या हाकेला प्रतिसाद देत भाजपला राज्यात मोठे यश मिळवून दिल्याची प्रतिक्रिया भाजप नेत्यांकडून व्यक्त होत आहे. काश्मीरी जनतेचा मोदींवर मोठ्या प्रमाणावर विश्वास आहे, त्यामुळेच जनता विधानसभा निवडणुकीत भाजपच्या बाजूने उभी राहिली. निवडणुकीचे निकाल पाहता येथील जनतेमध्ये राजकीय व्यवस्थेविषयी विश्वास निर्माण झाल्याचे दिसून येत असल्याचे केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी सांगितले. तर, भाजप नेते रविशंकर प्रसाद यांनी यापुढच्या काळात कमळ जोमाने फुलेल असा आत्मविश्वास व्यक्त केला. काश्मीरच्या जनतेने भाजप आणि पीडीपी या पक्षांना विभागून कौल दिल्यामुळे सत्तास्थापनेसाठी भाजप प्रादेशिक पक्षांची मदत घेणार की नाही, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. मात्र, यासंबंधीचा निर्णय ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा केल्यानंतरच घेतला जाणार असल्याचे भाजप नेत्या हिना भट यांनी सांगितले.
मात्र, काँग्रेस नेते गुलाब नबी आझाद यांनी भाजपच्या यशात काही विशेष नसल्याचे सांगितले. यापूर्वीही भाजपकडे ११ जागा होत्या, त्यामुळे भाजपने जिंकलेल्या जागांमध्ये लक्षणीय म्हणता येईल, अशी वाढ झाली नसल्याचे त्यांनी म्हटले. नरेंद्र मोदींनी या ठिकाणी आक्रमक प्रचार करूनही भाजपची ‘मिशन ४४’ अपयशी ठरल्याचे ताज्या निकालांवरून दिसून येत आहे.

Story img Loader