जम्मू काश्मीर येथील पहलगाम या ठिकाणी जो दहशतवादी हल्ला झाला, त्या हल्ल्यात महाराष्ट्रातले नागरिकही सापडले आहेत. डोंबिवली या ठिकाणी राहणाऱ्या तीन नागरिकांचा या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला.तीन डोंबिवलीकरांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या दहशतावादी हल्ल्यात २० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. या पर्यटकांमध्ये तीन डोंबिवलीकरांचा समावेश होता अशी माहिती समोर आली आहे.
दहशतवादी हल्ल्यात तीन डोंबिवलीकरांचा मृत्यू
अतुल मोने, हेमंत जोशी आणि संजय लेले अशा तीन जणांचा दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला आहे. हे तिघंही डोंबिवलीचे रहिवासी होते. हेमंत जोशी हे भागशाळा मैदान परिसरात वास्तव्य करत होते. तर संजय लेले हे सुभाष रोड भागात राहात होते. हे दोघंही अतुल मोने यांच्यासह पहलगामला गेले होते. या हल्ल्यात या तिघांचा मृत्यू झाला.
पुणेकर पर्यटक संतोष जगदाळे यांच्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पोस्ट काय?
पुण्यातील संतोष जगदाळे यांना काश्मिरमधील भ्याड दहशतवादी हल्ल्यात गोळ्या लागल्या असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांच्या पत्नी सुद्धा जखमी झाल्याची माहिती आहे. त्यांच्या पुण्यातील परिवारजनांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूरध्वनीवरुन संवाद साधला आणि त्यांना राज्य सरकारतर्फे सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.
प्रत्यक्षदर्शींनी काय काय सांगितलं?
एका पर्यटकाने सांगितल्यानुसार दहशतवाद्यांनी पर्यटकांना नावं विचारुन ठार केलं. एक महिला रडत तिच्या नवऱ्याला वाचवण्यासाठी टाहो फोडत होती हे दृश्यही कॅमेरात कैद झालं आहे. जो माणूस व्हिडीओ रेकॉर्ड करत होता तो तिला शांत राहण्याचं आवाहन करत होता असाही एक व्हिडीओ समोर आला आहे. एक लहान मुलगा सांगतो ते लोक समोरुन आले आणि त्यांनी गोळीबार सुरु केला. माझ्या नवऱ्याला दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून ठार केलं असं एका आक्रोश करणाऱ्या महिलेने सांगितलं.
अमित शाह यांची प्रतिक्रिया काय?
या हल्ल्यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या हल्ल्याचा निषेध व्यक्त करत यासाठी जबाबदार असणाऱ्यांना कठोर शिक्षा दिली जाईल असे म्हटले आहे. जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याने मी व्यथित झालो आहे. मृतांच्या कुटुंबियांच्या दु:खात मी सहभागी आहे. या भ्याड दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्यांना माफ केले जाणार नाही आणि त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल आणि त्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील, असे अमित शाह म्हणाले आहेत.