Jammu Kashmir : जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातून भारतीय लष्कराच्या दोन जवानांचे दहशतवाद्यांनी अपहरण केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. अपहरण झालेल्या दोन जवानांपैकी एकजण दहशतवाद्यांच्या तावडीतून कसा तरी पळून जाण्यास यशस्वी झाला होता. तर दुसरा एक जवान बेपत्ता होता. ही घटना दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील कोकरनाग जंगलात घडली. त्यानंतर अपहरण झालेल्या जवानाचा शोध घेण्यासाठी मोठी शोध मोहीम राबवण्यात येत होती. घटना घडल्यानंतर रात्रभर या बेपत्ता जवानाचा शोध घेण्यात येत होता. कोकरनाग जंगलात शोध मोहीम सुरु असताना या जवानाचा मृतदेह लष्कराला आढळून आला आहे. हिलाल अहमद भट असं मृतदेह सापडलेल्या जवानाचे नाव आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, ८ ऑक्टोबर रोजी दहशतवादविरोधी मोहिमेदरम्यान प्रादेशिक लष्कराच्या १६१ तुकडीतील दोन सैनिक अनंतनागमधील जंगल परिसरात गस्तीवर होते. मात्र, यावेळी दोन जवानांचे अपहरण झाले होते. या दोन जवानांपैकी एकजण दहशतवाद्यांच्या तावडीतून कसा तरी पळून येण्यास यशस्वी झाला. मात्र, दुसरा एक जवान बेपत्ता होता. ही घटना मंगळवारी (८ ऑक्टोबर) म्हणजे जम्मू-काश्मीर विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल जाहीर होत असताना घडली होती. त्यानंतर त्या जवानाचा शोध घेण्यासाठी शोध मोहीम राबवण्यात येत होती. शोध मोहिमेदरम्यान लष्कराच्या जवानांना या जवानाचा मृतदेह आढळून आला. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.

हेही वाचा : Jammu Kashmir : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून दोन जवानांचे अपहरण; एक जवान सुटला तर एकजण बेपत्ता

दरम्यान, माहितीनुसार, दहशतवाद्यांनी अपहरण केलेले जवान दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील रहिवासी होते. पोलिसांच्या माहितीनुसार, जंगलात दहशतवाद्यांच्या कारवाईची माहिती मिळाल्यानंतर लष्कराने शोध मोहीम सुरु केली होती. त्यासाठी सैन्याला पाठवले होते. मात्र, त्यानंतर अचानक दहशतवाद्यांनी दोन जवानाचे अपहरण केले. दोनपैकी एक पळून येण्यास यशस्वी झाला. दहशतवाद्यांनी त्यालाही गोळी मारली आणि त्याच्या खांद्याला दुखापत केली पण तो जवान सुखरूप बचावला. जखमी झालेल्या जवानाला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, त्यानंतर बेपत्ता जवानाचा शोध घेतला असता त्याचा मृतदेह आढळून आला.

२०२० मध्येही घडली होती अशीच घटना

दरम्यान, या आधी २०२० मध्येही एक अशीच घटना घडली होती. एका सैनिकाचे अपहरण झाले होते. त्यानंतर दहशतवाद्यांनी भ्याड कृत्य करत काश्मीरमध्ये प्रादेशिक लष्कराच्या एका सैनिकाचे अपहरण केले होते. त्या घटनेनंतर पोलीस आणि लष्कराने अनेक दिवस संपूर्ण परिसरात शोधमोहीम राबवली होती. मात्र, दहशतवाद्यांचा कोणताही पत्ता लागला नाही. घटनेनंतर काही दिवसांनी अपहरण झालेल्या सैनिकाचे कपडे कुटुंबाच्या घराजवळ सापडले होते. त्या घटनेनंतर तब्बल एक वर्षानंतर त्या जवानाचा मृतदेह सापडला सापडला होता.