Jammu Kashmir : जम्मू-काश्मीरमध्ये ३७० कलम हटवल्यानंतर १० वर्षांत पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक पार पडल्यानंतर मंगळवारी (८ ऑक्टोबर) या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. आता जम्मू-काश्मीरमध्ये नवे सरकार स्थापन होईल. मात्र, असं असतानाच आता जम्मू-काश्मीरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातून भारतीय लष्कराच्या दोन जवानांचे दहशतवाद्यांनी अपहरण केल्याची घटना समोर आली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, ८ ऑक्टोबर रोजी दहशतवादविरोधी मोहिमेदरम्यान प्रादेशिक लष्कराच्या १६१ तुकडीतील दोन सैनिक अनंतनागमधील जंगल परिसरात गस्तीवर होते. मात्र, यावेळी या दोन जवानांचे अपहरण करण्यात आले. मात्र, या दोन जवानांपैकी एकजण दहशतवाद्यांच्या तावडीतून कसा तरी पळून येण्यास यशस्वी झाला. मात्र, दुसरा एक जवान अद्याप बेपत्ता आहे. या घटनेनंतर आता बेपत्ता असलेल्या जवानाचा शोध घेण्यात येत आहे. ही घटना मंगळवारी (८ ऑक्टोबर) म्हणजे जम्मू-काश्मीर विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल जाहीर होत असताना घडली. आता या घटनेची चौकशी सुरु असून बेपत्ता जवानाचा शोध घेण्यासाठी शोध मोहीम राबवण्यात येत असल्याचं लष्कराने म्हटलं आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
OP KOKERNAG, #Anantnag
— Chinar Corps? – Indian Army (@ChinarcorpsIA) October 9, 2024
Based on intelligence input, a joint counter terrorist operation was launched by #IndianArmy alongwith @JmuKmrPolice & other agencies in Kazwan Forest #Kokernag on 08 Oct 24. Operation continued overnight as one soldier of Territorial Army was reported… pic.twitter.com/h1HV51ROKS
दहशतवाद्यांनी अपहरण केलेल्या लष्कराच्या दोन जवानांपैकी एक जवान दहशतवाद्यांच्या तावडीमधून सुटून आल्यानंतर प्राथमिक उपचारांसाठी तातडीने वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती सांगण्यात येत आहे.
२०२० मध्येही घडली होती अशीच घटना
दरम्यान, या आधी २०२० मध्येही एक अशीच घटना घडली होती. एका सैनिकाचे अपहरण झाले होते. त्यानंतर दहशतवाद्यांनी भ्याड कृत्य करत काश्मीरमध्ये प्रादेशिक लष्कराच्या एका सैनिकाचे अपहरण केले होते. त्या घटनेनंतर पोलीस आणि लष्कराने अनेक दिवस संपूर्ण परिसरात शोधमोहीम राबवली होती. मात्र, दहशतवाद्यांचा कोणताही पत्ता लागला नाही. घटनेनंतर काही दिवसांनी अपहरण झालेल्या सैनिकाचे कपडे कुटुंबाच्या घराजवळ सापडले होते. त्या घटनेनंतर तब्बल एक वर्षानंतर त्या जवानाचा मृतदेह सापडला सापडला होता.