जम्मू-काश्मीर मधील कुलगाम येथे शनिवारी सुरक्षा दलाबरोबर झालेल्या चकमकीत कुख्यात दहशतवादी झीनत उल इस्लामसह दोन दहशतवाद्यांचा खात्मा झाला. दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील कटपोरा परिसरात दहशतवादी लपून बसल्याची गोपनीय माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे सुरक्षादलांनी संपूर्ण परिसराला घेऊन शोध मोहीम राबवली होती. त्यावेळी झालेल्या चकमकीत हे दहशतवादी ठार झाल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
Jammu&Kashmir: Two terrorists were killed in a joint operation last night by the Army, Police and CRPF in Kulgam. The terrorists have been identified as Zeenat-ul-Islam and Shakeel Ahmed Dar. Weapons and other warlike stores recovered. Operations concluded.
— ANI (@ANI) January 13, 2019
शोध मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी सुरक्षादलांवर गोळीबार केला. सुरक्षादलाकडून याचे चोख प्रत्युत्तर देण्यात आले. या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. घटनास्थळावरून मोठ्याप्रमाणात दारूगोळा आणि शस्त्रात्रे जप्त करण्यात आली आहेत.
ठार झालेल्या दहशतवाद्यांपैकी एकाचे नाव कुख्यात दहशतवादी झीनत उल-इस्लाम असल्याचे सांगण्यात येते. तो अल-बद्र दहशतवादी संघटनेशी निगडीत होता. तर दुसऱ्या दहशतवाद्याचे नाव शकील अहमद दार असे आहे. झीनत हा आयईडी तज्ज्ञ मानला जात. यापूर्वी तो हिज्बुल मुजाहिदीनमध्ये होता.
काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांकडून आयईडीच्या माध्यमातून सुरक्षादलांना लक्ष्य केले जात आहे. या प्रकारात झीनतही सक्रीय होता असे मानले जाते. शुक्रवारी नौशेरा सेक्टरमध्ये आयईडी स्फोटात पुण्यातील खडकवासला येथील मेजर शशीधरन व्ही नायर यांच्यासह दोन जवान शहीद झाले होते.