सय्यद अली शाह गिलानी यांच्या नेतृत्वात फुटीरवाद्यांनी बुधवारी श्रीनगरमध्ये काढलेल्या रॅलीमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकावल्याचे आणि पाकिस्तान समर्थक घोषणा दिल्याचे पडसाद दुसऱ्या दिवशी उमटले. जम्मूमध्ये ठिकठिकाणी या घटनेच्या विरोधात निदर्शने करण्यात येऊन फुटीरवाद्यांच्या प्रतिमा जाळण्यात आल्या. या राष्ट्रविरोधी कारवाया करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, असे केंद्र सरकारने जम्मू-काश्मीर सरकारला सांगितल्यानंतर, या प्रकाराबाबत कायद्यानुसार योग्य ती कारवाई केली जाईल असे मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद म्हणाले. काश्मीर खोरे लष्कराच्या ताब्यात दिले जावे, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने केली आहे, तर भाजपने जम्मू-काश्मीरबाबतचे धोरण स्पष्ट करावे, असे आवाहन काँग्रेसने केले आहे.
फुटीरवाद्यांना, विशेषत: मसरत आलमला अटक करण्याची मागणी करून जम्मूमध्ये निदर्शकांनी या नेत्यांच्या प्रतिमा जाळल्या, तसेच केंद्र व राज्य सरकारविरोधी घोषणा दिल्या. ‘क्रांती दल’ या संघटनेच्या सुमारे १०० कार्यकर्त्यांनी पाकिस्तानच्या तसेच मुख्यमंत्री सईद यांच्या विरोधी नारे लावले व निदर्शने केली. जम्मू पश्चिम संघटनेच्या दीडशे जणांच्या गटाने पाकिस्तान, सईद व फुटीरवादी नेत्यांच्या प्रतिमा जाळल्या. जम्मू शहराच्या सीमेवरील मुथी भागात काश्मिरी पंडितांच्या एका गटाने निदर्शने केली.
हिंदू शिवसेनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनीही हुर्रियतच्या नेत्यांचा निषेध केला, तसेच मसरत आलमविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली. निदर्शकांनी जम्मूच्या अनेक भागांत वाहतूक रोखून धरली आणि गिलानी यांच्यासह हुर्रियत नेत्यांच्या प्रतिमा जाळल्या.
 केंद्र आणि काश्मीर सरकार फुटीरवाद्यांना राष्ट्रविरोधी कारवाया करण्यास पूर्ण मोकळीक देत असल्याचा आरोप करून, काश्मीर खोरे लष्कराच्या ताब्यात दिले जावे, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने केली. गिलानी व मसरत आलमसह इतरांनी केवळ पाकिस्तानचा झेंडाच फडकावला असे नाही, तर उघडपणे देशविरोधी घोषणा दिल्या. हा सारा प्रकार खुलेआम घडला आणि सुरक्षा दले व राज्याचे पोलीस यांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली. जोवर काश्मीर खोरे लष्कराच्या ताब्यात दिले जात नाही, तोवर तेथील परिस्थिती सुधारणार नाही, असे विहिंपचे नेते रमाकांत दुबे म्हणाले.
सईद सरकारने फुटीरवादी नेत्यांविरुद्ध ताबडतोब कारवाई करावी किंवा परिणाम भोगण्याची तयारी ठेवावी, असा इशारा भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी दिला आहे. मसरत आलम याच्याविरुद्ध ‘स्थानिक परिस्थिती’ लक्षात घेऊन योग्य वेळी कारवाई केली जाईल, असे उपमुख्यमंत्री निर्मल कुमार सिंग यांनी बुधवारी म्हटले होते. तथापि, त्यावर फुटीरवाद्यांच्या विरोधात केंद्रातील व राज्यातील पक्षनेत्यांची भूमिका सारखीच असल्याचे भाजपने आज स्पष्ट केले.

हे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत- सईद
नवी दिल्ली : फुटीरवादी नेत्यांनी काढलेल्या रॅलीत देण्यात आलेल्या पाकिस्तानसमर्थक घोषणा आणि पाकिस्तानचे झेंडे फडकावण्याच्या घटनेबाबत चहूबाजूंनी हल्ला चढवला गेल्यानंतर, हे प्रकार ‘अमान्य’ असून ते ‘खपवून घेतले जाणार नाहीत’, असे मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद यांनी गुरुवारी सांगितले.
श्रीनगरमधील फुटीरवाद्यांच्या रॅलीनंतर काही तासांत गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सईद यांना दूरध्वनी करून कायदा मोडणाऱ्यांविरुद्ध ‘त्वरित व कठोर’ कारवाई करण्यास सांगितले. भारतीय भूमीवर कुणी ‘पाकिस्तान झिंदाबाद’सारख्या घोषणा देणे आम्ही खपवून घेणार नाही; राष्ट्रीय सुरक्षेबाबत कुठलीही तडजोड होऊ शकत नाही आणि राजकारण राष्ट्रीय सुरक्षेवर अतिक्रमण करू शकत नाही, याची त्यांनी सईद यांना जाणीव करून दिली.
भाजप भागीदार असलेल्या राज्य सरकारने गिलानी याला पाच वर्षांनंतर श्रीनगरमध्ये रॅली काढण्यास परवानगी दिल्याबद्दल त्यांच्यावर टीकेचा भडिमार होत आहे. गेल्या महिन्यातच तुरुंगातून सुटलेला फुटीरवादी मसरत आलम याने लष्कर-ए-तोयबाचा संस्थापक हफीझ सईद याची प्रशंसा करून लोकांना या संघटनेत सामील होण्याचे आवाहन केले.
टीकेचा भडिमार झाल्यामुळे बचावात्मक भूमिका घ्यावी लागलेले मुफ्ती मोहम्मद सईद यांनी रॅलीला परवानगी देण्याचे समर्थन करण्याचा प्रयत्न केला; तथापि पाकिस्तानी झेंडे फडकावणे आणि पाकिस्तानसमर्थक घोषणा देणे ‘अमान्य असून ते खपवून घेतले जाणार नाही’, असे सांगितले. या घटनेबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून, कायदा त्याचे काम करेल, असे सईद म्हणाले.

‘केंद्राने काश्मीर धोरण स्पष्ट करावे’
भाजप फुटीरवाद्यांना पूर्ण मोकळीक देत असल्याचा आरोप करतानाच, पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी भाजपचे जम्मू-काश्मीरबाबतचे धोरण स्पष्ट करावे, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. तर, पीडीपी-भाजप सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप करून जम्मू-काश्मीर नॅशनल पँथर्स पार्टीने भाजपने त्यांचे ‘राष्ट्रीय चारित्र्य’ सिद्ध करावे, असे आव्हान दिले.

Story img Loader