जगाला हेवा वाटावा अशी शांतता भारतात रविवारी (२२ मार्च) बघायला मिळाली. करोना विषाणू भारतात मूळ घट्ट करू पाहत असतानाच राज्यांसह केंद्र सरकारनं त्याविरोधात लढा सुरू केला. राज्यांनी नागरिकांना गर्दी टाळा, काळजी घ्या. घरातच बसा, असं आवाहन सुरू केलं. गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तातडीचे आणि आपतकालीन पर्यायांचा विचार सुरू झाला. यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यू पाळण्याचं आवाहन केलं. त्याला स्वयंस्फूर्त प्रतिसाद देशभरातून मिळाला. रात्री ९ वाजेपर्यंत संचारबंदी असून, पाच वाजता अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे सगळ्यांनी आभार मानले.
आणखी वाचा
करोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी बिहारमध्ये ३१ मार्चपर्यंत लॉकडाऊनचे आदेश देण्यात आले आहेत. या काळात सर्व जीवनावश्यक सेवा मात्र, सुरु राहणार आहेत. बिहारच्या मुख्यमंत्री कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे.
गोव्यात आणखी तीन दिवसांसाठी संचारबंदीत वाढ करण्यात आली आहे. पंतप्रधानांच्या आवाहनाला चांगला प्रतिसाद देत जनतेने आजचा जनता कर्फ्यू यशस्वी केला. मात्र, केवळ एका दिवसापुरतं न ठेवता याचा करोनाच्या लढाईविरोधातला अधिक चांगला परिणाम व्हावा यासाठी गोवा सरकारने संचारबंदी आणखी तीन दिवस वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यूच्या केलेल्या आवाहनाला जनतेने उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. त्यानंतर आता मोदींनी जनतेला स्वतःला बंधनात अडकवून घेण्याचे आवाहन केले आहे.
महाराष्ट्रात परदेशातून आलेल्या लोकांच्या माध्यमातूनच करोना आला. मात्र, आता याला आळा बसणार आहे. कारण परदेशातून येणारी विमान मध्यरात्रीपासून बंद करण्यात येणार आहे. त्याचबरोबर शेजारील राज्यांमधून लोक येऊन नये म्हणून राज्याच्या सीमा बंद करण्याचा विचार सुरू आहे. यासंदर्भातील प्राथमिक कारवाई करण्यात आलेली आहे. गरज लक्षात घेऊन लवकरच हा निर्णय घेऊ, असं टोपे म्हणाले.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत सरकारनं घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. 'राज्यातील जनतेनं आज जे सहकार्य केलं. तेच सहकार्य पुढील काळातही सरकारला करावं. महाराष्ट्र अजूनही दुसऱ्या टप्प्यात आहे. आपल्याला करोनाचा गुणाकार करायचा नाही, तर वजाबाकी करायची आहे, असं टोपे म्हणाले.
महाराष्ट्रातील जनतेच्या सुरक्षेसाठी राज्य सरकारनं जनता कर्फ्यू वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याची माहिती दिली. 'काही निर्णय अत्यंत जड अंतकरणानं घ्यावे लागतात. मात्र, करोनाचा प्रसार ज्या गुणाकार पद्धतीनं होत आहे. त्याला रोखण्यासाठी सरकारनं निर्णय घेतला आहे. आज पाळण्यात येत असलेला जनता कर्फ्यू उद्या सकाळी पाच वाजेपर्यंत चालणार आहे. त्यानंतर ३१ मार्चपर्यंत कर्फ्यू लागू करण्यात येईल. यातून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत,' अशी माहिती टोपे यांनी दिली.
करोनाच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी सक्षम असल्याचं भारतीयांनी आपल्या संयमानं आणि निर्धारानं दाखवून दिलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जनता कर्फ्यू पाळण्याच्या हाकेला भारतीयांनी घरात राहून उत्फूर्तपणे साद दिली. संपूर्ण देश दिवसभर घरात राहून करोनाशी लढत असल्याचं चित्र महानगर, शहर आणि गाव वस्त्यावरील दृश्यातून दिसून आलं. सायंकाळी पाच वाजताच अचानक टाळ्या, थाळ्यांच्या आवाजाबरोबर शंखनाद सुरू झाला. करोनाचा मुकाबला करत देशवासियांच्या सेवेसाठी झटणाऱ्या सर्वांविषयी देशानं कृतज्ञता व्यक्त केली.
घराबाहेर न पडण्याचं लोकांना वारंवार आवाहन करुनही त्याचा पुरेसा परिणाम होत नसल्याने दिल्ली पोलिसांनी मोठं पाऊल उचललं आहे. संपूर्ण दिल्ली शहरात दिल्ली पोलिसांनी जमावबंधीचं कलम १४४ लागू केलं आहे.
तामिळनाडू सरकारने आजच्या जनता कर्फ्यूमध्ये वाढ करुन उद्या सकाळी ५ वाजेपर्यंत वाढ केली आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत स्वतःहून घराबाहेर न पडण्याचा निर्णय घेतला आहे. भारतात करोना बाधितांची संख्या ही ३००च्यावर पोहोचला आहे.
महाराष्ट्रात १४४ कलम लागू झाले असले तरी नागरिकांनी घाबरून जाऊ नये. या काळात अत्यावश्यक सेवा सुरू राहतील. किराणा दुकानं, मेडिकल, दूध, वीज, बँक यासह जीवनावश्यक सेवा सुरू राहतील. बस बंद राहतील. फक्त जीवनावश्यक सेवा पुरवणाऱ्या लोकांसाठी सेवा सुरू राहतील, असं मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात १४४ कलम लागू करत असल्याची घोषणा केली. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेबरोबर संपूर्ण महाराष्ट्रातील परिस्थिती लॉक डाऊनमध्ये गेली आहे. येणाऱ्या काळात राज्यातील नागरिकांनी दक्षता घ्यावी. कारण हा विषाणू गुणाकाराप्रमाणे फैलावत आहे. त्यामुळे काळजी घ्या. महाराष्ट्र खंबीर आहे, असं निर्धार ठाकरे यांनी व्यक्त केला.
जनता कर्फ्यूच्या दरम्यान मुंबईतून आणखी एक धक्कायदायक बातमी समोर येत आहे. दुबईहून आलेले २३ करोना संशयित मुंबईत आढळून आले आहेत. फोर्ट विभागातील अल्फा गेस्ट हाऊस भागातील मोदी स्ट्रीट येथे हे दिसून आले आहेत. त्यामुळे आरोग्य विभागासमोर एक नवं आव्हान निर्माण झालं आहे.
देशात जनता कर्फ्य़ू पाळला जात आहे. प्रत्येक जण घरात बसू करोनाविरोधात लढा देत आहे. सर्वसामान्य माणसासह राजकीय नेते, विविध क्षेत्रातील नामवंत मंडळी, सेलिब्रिटी सकाळपासून घरात राहून या कर्फ्यूमध्ये सहभागी झाली आहे. कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या खासदारांना असाल त्या ठिकाणी थांबण्याच्या सूचना दिल्या आहेत. 'राष्ट्रवादीच्या लोकसभेती आणि राज्यसभेतील खासदारांना विनंती आहे की, असाल त्या ठिकाणी थांबा. दिल्लीला जाण्याचा प्रयत्न करू नका. सरकारला सहकार्य करा,' असं पवार यांनी ट्विट करून म्हटलं आहे.
करोनामुळे सर्वात आधी पुणे चर्चेत आलं. महाराष्ट्रातील पहिला रुग्ण पुण्यातच सापडला. चक्क एका दाम्पत्यालाच करोना झाल्याचं निष्पन्न झालं आणि पुण्यातील नागरिक हादरले. इतके दिवस परदेशातील बातम्या वाचणाऱ्या पुणेकरांना हा धक्काच होता. त्यानंतर पुणे हळूहळू बंद होत गेल. जनता कर्फ्यू दरम्यान पुण्यातील परिस्थिती टिपली लोकसत्ता डॉट कॉमचे प्रतिनिधी सागर कासार यांनी.
देशाची राजधानी अखेर ठप्प झाली आहे. करोनानं थैमान घातल्यानंतर जगात आरोग्य आणीबाणी लागू करण्यात आलेली आहे. महाराष्ट्रात करोनानं शिरकाव केल्यानंतर राज्य सरकारनं टप्प्याटप्प्यानं लॉक डाऊन करण्याच्या दिशेनं पाऊल टाकली होती. गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील लोकल सेवा बंद करण्याची चर्चा सुरू होती. अखेर मुंबईतील लोकल सेवा बंद करण्यात आली असून, मुंबई लॉक डाऊन झाली आहे.
पंतप्रधान नरेंद मोदी यांनी केलेल्या जनता कर्फ्यूच्या आवाहनाला सकाळपासूनच चांगला प्रतिसाद मिळाला. बिग बी अमिताभ बच्चन यांनी मरिन ड्राव्हईवरील एक व्हिडीओ ट्विट केला आहे.
देशात जनता कर्फ्यू सुरू आहे. सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशात लोक स्वयंस्फूर्तीनं कर्फ्यू पाळत आहे. अनेक राजकीय नेत्यांसह सेलिब्रिटीही घरीच आहेत. त्यांनी तसं सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितलं आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही ट्विट केलं आहे. मी पण घरी आहे. तुम्हीही घरीच थांबा असं आवाहन त्यांनी केलं आहे.
इतर राज्यांप्रमाणेच पर्यटकांच्या गर्दीनं गजबजलेलं गोवा सध्या शांत आहे. जनता कर्फ्यूमुळे गोव्यातील रस्ते, बीच सगळीकडेच शांतता आहे.
देशात जनता कर्फ्यू पाळला जात असतानाच पंजाबमधील चंदीगढमध्ये एक करोनाग्रस्त रुग्ण सापडला आहे. त्यामुळे पंजाब सरकारनं तातडीनं पाच जिल्ह्यात लॉक डाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. जालदंर, पटियाला, नवानशहर, होशियारपूर आणि संगरूर जिल्ह्यात लॉक डाऊन करण्यात आलं आहे. ३१ मार्चपर्यंत लॉक डाऊन करण्यात आलं आहे.
महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी अशी ओळख असलेलं पुणे सध्या निपचित पडले आहे. करोनाचा संसर्ग वाढल्यानं पुणेकरांनी पुढाकार घेत बाहेर पडणं टाळण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यूची हाक दिल्यानंतर आज (२२ मार्च) पुण्यातील रस्त्यांवर शुकशुकाट आहे. कायम वर्दळ असणाऱ्या पुण्यात आज स्मशान शांतता पसरली आहे. महाराष्ट्र इन्फो सेंटरनं यासंदर्भात एक व्हिडीओ ट्विट केला आहे.
करोनानं महाराष्ट्रात दुसरा बळी घेतला. मुंबईत उपचार सुरू असलेल्या एका ५६ वर्षीय रुग्णाचा रविवारी मृत्यू झाला. तर करोनाबाधितांचा आकडा ७४ वर गेला आहे. आणखी दहा जणांना करोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. यात मुंबईत ६, पुण्यात ४ रुग्ण आढळून आले आहेत. ५ जण परदेशातून आलेले असून, ४ जणांना संपर्कात आल्यानं लागण झाली आहे.
जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील प्रवाशांचा भार वाहणारी दिल्ली मेट्रो दिवसभरासाठी बंद करण्यात आलेली आहे. मेट्रो प्रशासनानं यासंदर्भात ट्विट करून माहिती दिली.
करोनाचा संसर्ग थांबवण्यासाठी राज्य सरकारकडून तातडीनं पावलं उचलली जात आहेत. त्यात पंतप्रधानांनी जनता कर्फ्यूची हाक दिल्यानंतर नागरिकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून येत आहे. मात्र मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये वेगळं दृश्य आज आहे. केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच स्थानकात प्रवेश दिला जात आहे.
पुण्यातील नागरिकांना छायाचित्रातील ठिकाण लगेच लक्षात आलं असेल. नेहमी गजबजलेली महात्मा फुले मंडई आज मात्र चिडीचूप आहे. यावरून एकूण पुण्यातील परिस्थितीचा अंदाज येतो. (फोटो : सागर कासार)
कोल्हापूरमधून जाणाऱ्या पुणे बंगळुरू महामार्ग. नेहमी वाहनांची वर्दळ असणाऱ्या या राष्ट्रीय महामार्गावर जनता कर्फ्यूच्या काळात असा शुकशुकाट आहे.
कोल्हापूरमधून जाणाऱ्या पुणे बंगळुरू महामार्ग. नेहमी वाहनांची वर्दळ असणाऱ्या या राष्ट्रीय महामार्गावर जनता कर्फ्यूच्या काळात असा शुकशुकाट आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर अभिनेत्री प्रियंका चोप्रानं पती निकसोबतचा एक फोटो इन्स्टाग्रावर शेअर केला आहे. त्यांचबरोबर तिने घरातच राहण्याचं आवाहन आपल्या चाहत्यांना केलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी संवाद साधताना आज (२२ मार्च) जनता संचारबंदी (जनता कर्फ्यू) पाळण्याचं आवाहन केलं होतं. या कर्फ्यूला पहाटे सुरूवात झाली आहे. या जनता कर्फ्यूदरम्यान अनेक सेवा बंद राहणार आहेत.
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणजे रात्रंदिवस गर्दी असलेलं ठिकाण. मुंबई आणि उपनगरांसह देशभरातून लोक रेल्वेनं प्रवास करत येतात. त्यामुळे हे ठिकाण गर्दीनं नेहमी वाहत राहत. जनता कर्फ्यूला सुरूवात झाल्यानंतर इंडियन एक्स्प्रेसचे छायाचित्रकार निर्मल हरिंद्रन यांनी सीएसएमटीसमोरील टिपलेलं हे छायाचित्र.
जनता कर्फ्यूला महाराष्ट्रातूनही सकाळी चांगला प्रतिसाद मिळाला. मॉर्निंग वॉकला घराबाहेर पडणाऱ्या, सकाळची कामं करणाऱ्या लोकांमुळे पुणे, मुंबईतील रस्ते दररोज गर्दीनं भरुन वाहतात. सकाळीच सुरु होणारी गर्दी रात्री हळूहळू ओसरत जाते. पण, जनता कर्फ्यू सुरू झाल्यानंतर मुंबई पुण्यातील रस्ते ओस पडले आहेत. याची साक्ष देणारा पुण्यातील हा रस्ता.
आज सुरू झालेल्या जनता कर्फ्यूला सर्वच राज्यातील नागरिकांकडून प्रतिसाद मिळू लागला आहे. केरळमधील त्रिवेंद्रम शहरातील रस्ते असे ओस पडले आहे.
नेहमीप्रमाणेच रविवारचा दिवस उजाडला आहे. पण, रस्त्यावर ना व्यायाम करणाऱ्यांची गर्दी आहे, ना ऑफिसला जाणाऱ्यांची. जनता कर्फ्यू सुरू झाल्यानंतरची हैदराबादमधील दृश्य.
देशात करोनाचे नवे रुग्ण आढळले असून सरकारने या विषाणू संसर्गाच्या चाचणी निकषांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी दिली. यापुढे करोना चाचणी करताना परदेश प्रवासाचा इतिहास नसला तरी न्यूमोनियाच्या रुग्णांचा संशयित रुग्णांमध्ये समावेश करण्यात येणार आहे. देशात करोना विषाणूबाधितांची संख्या वेगाने वाढत असून शनिवारी ६० नवे रुग्ण आढळल्याने एकूण रुग्णसंख्या २८३ वर पोहोचल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली. बाधितांमध्ये ३९ परदेशी नागरिक आहेत.
जनता कर्फ्यूला बॉलिवूडमधील कलाकारांनी पाठिंबा देत जनतेला यात सहभागी होण्याचं आवाहन केलेलं आहे. अभिनेता रितेश देखमुखनं सकाळीच ट्विट करून देशातील जनतेला कर्फ्यू पाळण्याचं आवाहन केलं आहे. गुड मॉर्निंग इंडिया, घरातच रहा, सुरक्षित रहा, असं आवाहन रितेशनं केलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेशी संवाद साधताना करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जनता कर्फ्यू पाळण्याचं आवाहन केलं होतं. त्यानुसार सकाळी कर्फ्यूला सुरूवात झाली असून, मोदी यांनी पहाटेच ट्विट करून यात सर्वांनी सहभागी होण्याच आवाहन केलं आहे. 'जनता कर्फ्यू सुरू होत आहे. मी विनंती करतो की, सर्व नागरिकांनी या देशव्यापी अभियानात सहभागी होऊन करोनाविरोधातील ही लढाई यशस्वी करावी. आपला संयम आणि निर्धार या आजाराला पराभूत केल्याशिवाय राहणार नाही, असं ट्विट मोदी यांनी केलं आहे.