काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी १९७७मध्ये सर्व समाजवादी विचारसरणीचे गट एकत्र आले आणि त्यांनी ‘जनता परिवारा’ची स्थापना केली होती. आता नरेंद्र मोदी यांच्या भाजप सरकारविरोधात दंड थोपटण्यासाठी सर्व समाजवादी गटांनी ‘ऐक्य’ करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि संयुक्त जनता दलाचे नेते नितीश कुमार यांनी त्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
विशेष म्हणजे अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील जनसंघही १९७७च्या काळात ‘जनता परिवारा’सोबत होता. मात्र आता वाजपेयी यांच्याच भाजपला दूर करण्यासाठी या समाजवादी संघटनांनी एकत्र येण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंग यांचे ‘१२ तुघलक रोड’ या निवासस्थानाचे स्मारकात रूपांतर करण्यासाठी राष्ट्रीय लोकदलाचे नेते अजित सिंग यांनी सभेचे आयोजन केले होते. त्या वेळी नितीश कुमार यांनी हे आवाहन केले.
‘‘राममनोहर लोहिया, चौधरी चरणसिंग यांची विचारसरणी पुढे नेण्यासाठी समाजवादी संघटनांनी एकत्र येणे गरजेचे आहे. जर आपण एकत्र आलो, तर देशाला दिशा देण्याचा प्रयत्न करू. पण आपण वेगवेगळे लढलो, तर कधीही विकास होऊ शकत नाही,’’ असे नितीश यांनी सांगितले.
माजी पंतप्रधान आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाचे प्रमुख एच. डी. देवेगौडा, संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष शरद यादव, समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंह यादव यांचे बंधू शिवपाल यादव आणि उत्तर प्रदेश व उत्तराखंडमधील काँग्रेसचे काही नेते या वेळी उपस्थित होते. ‘‘लालुप्रसाद यादव आणि आम्ही गेली २० वष्रे वेगवेगळे लढलो, पण ज्या वेळी धोका जाणवायला लागला, तेव्हा आम्ही एकत्र आलो,’’ असे नितीश म्हणाले. देवेगौडा यांनीही या वेळी सर्व धर्मनिरपेक्ष गटांनी एकत्र यावे, असे आवाहन केले.

Story img Loader