मनमोहन सिंग सरकारने बिहारला विशेष राज्याचा दर्जा दिला तरी त्याच्या बदल्यात २० खासदार असलेल्या जनता दल युनायटेडचा सरकारला पाठिंबा देण्याचा विचार नाही. जदयुचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि राज्यसभा सदस्य के. सी. त्यागी यांनी आज ही बाब स्पष्ट करीत नितीशकुमार यांच्याशी जवळीक साधण्याच्या काँग्रेसच्या डावपेचांना एकप्रकारे धक्काच दिला आहे.
जदयुचे सर्वोच्च नेते व मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत बिहारला विशेष राज्याचा दर्जा देण्याचे गाजर केंद्रात अल्पमतात आलेले मनमोहन सिंग सरकार गेल्या काही दिवसांपासून दाखवत आहे. केंद्रीय नियोजन आयोगात त्या दृष्टीने हालचालीही सुरू झाल्या आहेत. भाजपमध्ये पंतप्रधानपदाच्या उमेदवारीसाठी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नावाची चर्चा सुरू झाल्याने धर्मनिरपेक्ष नितीशकुमार रालोआतून बाहेर पडण्याची चिन्हे असल्यामुळे बिहारला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या नावाखाली त्यांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे.
 गेल्या काही दिवसांपासून केंद्रातील सत्ताधारी काँग्रेस आणि विरोधात असलेला जदयु यांच्यातील स्वाभाविक दुरावा बराच कमी झाला आहे. त्यामुळे केंद्रातील काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकार अडचणीत आल्यास लोकसभेतील जदयुच्या २० खासदारांची मदत होईल, अशी चर्चा सुरू झाली आहे. पण बिहारला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या बदल्यात अशी कोणतीही सौदेबाजी होणार नाही, असे त्यागी यांनी स्पष्ट केले. मोदी यांच्या मुद्यावरून नितीशकुमार आणि जदयु बिहारमध्ये सत्तेत भागीदार असलेल्या भाजपपासून दुरावत असले तरी त्यांचा कल काँग्रेसकडे निश्चितच नाही, असे जदयुच्या वर्तुळात बोलले जात आहे. त्यामुळे विशेष दर्जा देण्याचे आमिष दाखवूनही काँग्रेसला अपेक्षित फलप्राप्ती होणार नाही, असे जदयु सूत्रांचे म्हणणे आहे.
१८ खासदारांच्या द्रमुकने पाठिंबा काढल्यानंतर २२ खासदार असलेल्या समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंह यादव यांनीही मनमोहन सिंग सरकारवरील दबाव वाढविला असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते केंद्रातील सरकार आणखी वर्षभर चालविण्यासाठी वेगवेगळ्या पर्यायांवर विचार करीत आहेत.