Japan Crime News : जपानमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका मुलाने आपल्या वडिलांचा मृतदेह दोन वर्षे कपाटात लपवून ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे. वडिलांचा मृतदेह कपाटात दोन वर्ष लपवून ठेवल्याचं कारण जेव्हा समोर आलं तेव्हा सर्वांनाच धक्का बसला आहे. या प्रकरणात आता पोलिसांकडून मुलाला अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
जपानी पोलिसांना असं आढळून आलं की नोबुहिको सुझुकीने वडिलांचा मृतदेह दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला होता. वृत्तानुसार, जानेवारी २०२३ मध्ये ८६ वर्षीय वडिलांचं निधन झालं होतं. मात्र, तेव्हापासून आतापर्यंत मृतदेह लपवून ठेवण्यात आला. अंत्यसंस्काराचा खर्च वाचवण्यासाठी हे कृत्य केल्याची माहिती त्याने पोलिसांना सांगितली आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
वृत्तानुसार, सुझुकीने एका आठवड्यापासून टोकियोमध्ये त्यांचं छोटसं चायनीज रेस्टॉरंट उघडलं नव्हतं. ज्यामुळे शेजाऱ्यांना चिंता लागली आणि त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला. पोलीस अधिकारी सुझुकीच्या घरी त्याची चौकशी करण्यासाठी पोहोचले. तेव्हा पोलिसांना घरातील कपाटात लपवलेल्या अवस्थेत वडिलांच्या मृतदेहाचा सांगाडा सापडला. यानंतर पोलिसांनी चौकशी केली असता अंत्यसंस्काराचा खर्च परवडत नसल्याचं त्याने सांगितलं.
दरम्यान, पोलिसांना अद्याप सुझुकीच्या वडीलांच्या मृत्यूचं कारण समजू शकलेलं नाही. जानेवारी २०२३ मध्ये वयाच्या ८६ व्या वर्षी त्याच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर त्याने मृतदेह लपवून ठेवल्याचं सुझुकीने पोलिसांना सांगितलं असलं तरी त्याच्या वडिलांचा मृत्यू नेमकं कसा झाला याबद्दल कोणतीही माहिती पोलिसांना मिळाली नाही. पण सुझुकीने दावा केला की जेव्हा तो कामावरून घरी आला तेव्हा त्याला त्याच्या वडिलांचा मृतदेह आढळून आला होता. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणात पोलिसांकडून तपास सुरु करण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी मुलगा सुझुकी याला ताब्यात घेतलं आहे.
अंत्यसंस्कार लपवण्याची ही पहिलीच घटना नाही
दरम्यान, आर्थिक कारणांसाठी अंत्यसंस्कार लपवण्याची ही पहिलीच घटना नाही. एससीएमपीने नोंदवल्याप्रमाणे जपानमध्ये अशाच प्रकारच्या घटना याआधीही समोर आलेल्या आहेत. २०२३ मध्ये एका ५६ वर्षीय बेरोजगार पुरूषाने अंत्यसंस्काराचा खर्च टाळण्यासाठी त्याच्या ७२ वर्षीय आईचा मृतदेह तीन वर्षे (२०१९-२०२२) घरी ठेवला आणि तिच्या पेन्शनचा दावा करत राहिला. त्यानंतर संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलिसांनी केल्यानंतर त्याने न्यायालयाला सांगितलं की आईची पेन्शन हीच त्याची एकमेव आर्थिक मदत होती.