Japan Earthquake Updates : जपानला सोमवारी (१ जानेवारी) शक्तिशाली भूकंपांचे धक्के बसले. या हादऱ्यांनंतर देण्यात आलेला तीव्र त्सुनामीचा इशारा मागे घेण्यात आला असला तरी अद्याप किनारपट्टी भागांत असलेल्या घरांमध्ये न परतण्याची सूचना नागरिकांना करण्यात आली आहे. त्सुनामीच्या इशाऱ्यानंतर किनारपट्टी भागांतील सुमारे एक लाख नागरिकांचे तात्पुरते स्थलांतर करण्यात आले. तर या भूकंपात ३० जणांचा मृत्यू झाला आहे. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारच्या भूकंपात किमान ३० लोक ठार झाले आहेत. वाजिमा शहरांत भूकंपाचे मुख्य केंद्र होतं. तर, १९ जणांना कार्डिअॅक अटॅक आल्याची माहिती अग्निशमन आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांनी दिली, अशी माहिती रॉयटर्सने दिली आहे.

स्थानिक वेळेनुसार दुपारी चार वाजण्याच्या सुमारास इशिकावाच्या किनाऱ्याजवळ आणि आसपासच्या प्रांतांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवल्याचे जपानच्या हवामान यंत्रणेने सांगितले. प्राथमिक अंदाजानुसार यापैकी सर्वात मोठा धक्का ७.६ रिश्टर स्केल तीव्रतेचा होता. त्यानंतर इशिकावासह अन्य किनारपट्टी भागांसाठी तीव्र त्सुनामी लाटांचा इशारा जारी करण्यात आला होता. लोकांना छतांसारख्या उंच भागात जाण्याच्याही सूचना देण्यात आल्या होत्या.

हेही वाचा >> जपानमध्ये किनारपट्टीच्या भागात डझनभरहून अधिक भूकंपाचे धक्के, घरांचं नुकसान, रस्त्यांना भेगा अन्…

१०० हून अधिक इमारतींना आग

भूकंपाच्या पार्श्वभूमीवर मध्यवर्ती वाजिमा सिटी, इशिकावा प्रीफेक्चरमध्ये १०० हून अधिक इमारतींना आग लागली होती. तर, या इमारतींमध्ये अनेक लाकडी दुकाने असल्याचे वृत्त स्थानिक माध्यमांनी दिले आहे.

भारतीय दूतावासाचा नियंत्रण कक्ष

भूकंप आणि सुनामीच्या इशाऱ्यानंतर जपानमधील भारतीय दूतावासाने आपल्या नागरिकांच्या मदतीसाठी आपत्कालीन नियंत्रण कक्षाची स्थापना केली. आपल्या ‘एक्स’ समाजमाध्यम खात्यावर संपर्क क्रमांक तसेच ‘ईमेल आयडी’ जारी करून आपत्कालीन स्थितीत संपर्क साधण्याचे आवाहन दूतावासाने केले आहे.

येत्या काही दिवसांत पुन्हा भूकंपाची शक्यता

जपानमध्ये २०११ साली आलेल्या भूकंपानंतर पहिल्यांदाच त्सुनामीबाबत मोठा इशारा देण्यात आला आहे. येत्या काही दिवसांत भूकंपाचे आणखी धक्के जाणवण्याची शक्यता जपानच्या हवामान विभागानं वर्तवली आहे. भूकंपानंतर इशिकावा आणि तोयामा प्रांतात वीज पुरवठा खंडीत झाला आहे. त्यामुळे ३६ हजार हून अधिक घरांची वीज गेली आहे, असं युटिलिटी होकुरिकू इलेक्ट्रिक पॉवरकडून सांगण्यात आलं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Japan earthquake 12 dead in devastating earthquake millions displaced will there be a tsunami sgk