जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांचं प्राणघातक हल्ल्यामध्ये निधन झाल्याच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने उद्या म्हणजेच शनिवार ९ जुलै रोजी एका दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. २०२१ साली पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या आबे यांच्यावर आज सकाळी एका सभेदरम्यान अज्ञात व्यक्तीने गोळीबार केला. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या आबे यांचा उपचारादरम्यान दुपारी दीडच्या सुमारास मृत्यू झाला. आबे यांच्या मृत्यूची बातमी समोर आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवरुन शोक व्यक्त करतानाच राष्ट्रीय दुखवट्याची घोषणा केलीय.

नक्की वाचा >> Shinzo Abe Death : जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांची हत्या; दोन तास मृत्यूशी अयशस्वी झुंज

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“माझ्या फार जवळचे मित्र असणाऱ्या शिंजो आबे यांच्या निधनामुळे मला शब्दांमध्ये मांडता येणार नाही एवढं दु:ख झालं आहे. आबे हे जागतिक स्तरावरील फार उंच व्यक्तीमत्व होते. ते एक उत्तम नेते आणि प्रशासक होते. जपानला आणि जगाला अधिक सुंदर बनवण्यासाठी त्यांनी त्यांचं आयुष्य खर्ची केलं,” अशा शब्दांमध्ये मोदींनी आपल्या जवळच्या मित्राला श्रद्धांजली अर्पण केलीय.

“जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्या सन्मानर्थ ९ जुलै रोजी राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात येत आहे,” असं ट्विट पंतप्रधान मोदींच्या ट्विटर हॅण्डलवरुन करण्यात आलंय. “माझे आणि आबे यांचे अनेक वर्षांपासून मैत्रीपूर्ण संबंध होते. गुजरातचा मुख्यमंत्री असताना माझी त्यांच्याशी ओळख झाली होती. आमची मैत्री मी पंतप्रधान झाल्यानंतरही कायम राहिली. अर्थव्यवस्था, जागतिक घडामोडींवर त्यांचं ज्ञानामुळे मी कायमच प्रभावित व्हायचो,” असंही मोदींनी म्हटलं आहे.

नक्की वाचा >> विश्लेषण : शिंजो आबे यांना पद्मविभूषण पुरस्कार का देण्यात आला होता?

“नुकतीच जपान दौऱ्यामध्ये मला आबे यांना पुन्हा एकदा भेटण्याची संधी मिळालेली. त्यावेळी आम्ही अनेक विषयांवर चर्चा केलेल्या. ते नेहमीप्रमाणे विनोदी आणि सविस्तर पद्धतीने बोलत होते. ही आमची शेवटी भेट असेल असं मला वाटलं नव्हतं,” अशा शब्दांमध्ये मोदींनी आबेंसोबतच्या शेवटच्या भेटीची आठवण ट्विटरवरुन सांगितली. “माझ्या सद्भावना त्यांचे कुटुंबिय आणि जपानी लोकांसोबत आहेत,” असंही मोदी म्हणालेत.

“आबे यांनी भारत आणि जपानमधील संबंध सुदृढ करण्यासाठी भरीव योगदान दिलं होतं. यामध्ये विशेष आणि जागतिक स्तरावरील भागीदारी त्यांनी भारतासोबत प्रस्थापित केलेली. आज संपूर्ण भारत देश जपानसोबत उभा आहे. या कठीण प्रसंगात भारत जपानी बंधू-भगिनींसोबत ठामपणे उभा आहे,” असंह मोदींनी म्हटलंय.

“टोकीयोमध्ये नुकताच मी जेव्हा माझे प्रिय मित्र शिंजो आबे यांना भेटलोले तेव्हाचा हा फोटो आहे. भारत आणि जपानमधील संबंध दृढ करण्यासाठी ते कायमच उत्साही असायचे. त्यांनी नुकतच जपान-भारत असोशिएशनचं अध्यक्षपद स्वीकारलं होतं,” असं मोदींनी आबेंसोबतचा फोटो शेअर करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिलाय.

नेमकं घडलं काय?
पश्चिम जपानमधील नारा शहरामध्ये एका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ६७ वर्षीय आबे यांची एक सभा आयोजित करण्यात आली होती. रेल्वे स्थानकाजवळच्या रस्त्यावरील या सभेमध्ये आबे यांचं भाषणा सुरु असतानाच त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला आणि ते खाली कोसळले. ते संसदेच्या वरिष्ठ सभागृहाच्या निवडणुकीपूर्वी एका सभेला संबोधित करत होते. ही घटना शुक्रवारी सकाळी ११.३० वाजता घडली.

पाहा व्हिडीओ –

आबे हे शहरातील एका रस्त्यावर भाषण करत असताना त्यांच्यावर हल्ला झाला. त्यावेळी बंदुकीच्या गोळीसारखा आवाज ऐकू आला आणि घटनास्थळी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले, असे एनएचकेने सांगितले. घटनास्थळावरील एनएचकेच्या पत्रकाराने सांगितले की, आबे यांच्या भाषणादरम्यान त्यांना सलग दोन गोळ्यांचे ऐकू आले.

गोळी लागल्यानंतर आबे यांना हृदयविकाराचा झटका आल्याचाही दावा स्थानिक प्रसारमाध्यमांनी केला होता केलेला. आबे यांना बेशुद्धावस्थेतच तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. जवळजवळ तीन तास ते मृत्यूशी झुंज देत होते. दुपारी दीडच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. २०२१ मध्ये भारत सरकारने शिंजो आबे यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केलं होतं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Japan ex pm shinzo abe died at 67 prime minister narendra modi pays tribute says shocked saddened beyond words scsg