मालवाहतुकीसाठी समर्पित अशा मार्गिका प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी तसेच दक्षिण भारतातील पायाभूत सुविधा प्रकल्पासाठी जपान भारताला २२.६ अब्ज डॉलरचे कर्ज देईल, असे जपानचे पंतप्रधान योशिहिको नोडा यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना सांगितले. दोघा नेत्यांची नुकतीच भेट झाली असता हे आश्वासन देण्यात आले आहे.
जपानने कर्ज देण्याची जी घोषणा केली आहे त्याचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी स्वागत केले असून दिल्लीच्या मेट्रो प्रकल्पासारख्या पायाभूत प्रकल्पात जपानने गुंतवणूक करण्यास अग्रक्रम द्यावा अशी भारताची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. दिल्ली मेट्रो हे संयुक्त प्रकल्पाचे अतिशय चांगले उदाहरण असून त्याचे इतर शहरांनी अनुकरण करण्यासारखे आहे.
मनमोहन सिंग व योशिहिको नोडा यांची १६ नोव्हेंबरला टोकियो येथे शिखर बैठकीच्या निमित्ताने भेट होणार होती तथापि जपानमध्ये अचानक झालेल्या राजकीय घडामोडींमुळे त्यांचा दौरा रद्द करण्यात आला होता. आज मात्र पूर्व आशिया शिखर बैठकीच्या निमित्ताने दोघा नेत्यांची भेट झाली त्या वेळी नोडा यांनी दोन्ही देशात निकटचे धोरणात्मक सहकार्य व जागतिक भागीदारी असण्याच्या आवश्यकतेवर भर दिला.
नोडा यांनी श्री. सिंग यांना सांगितले की, टोकियोतील भेट जपानमधील राजकीय घडामोडींमुळे रद्द झाली असली तरी आता यापुढे आम्ही दोन्ही देशातील परस्पर संबंधात आणखी प्रगती करण्याबाबत चर्चा करणार आहोत.
नोडा यांनी सांगितले की, दक्षिण भारतातील तिसरा पायाभूत सुविधा प्रकल्प व मालवाहतुकीसाठी समर्पित मार्गिकेसाठी परदेशी विकास सहायता निधीतून भारताला कर्जाचा दुसरा हप्ता दिला जाईल. नवीन कर्जाची रक्कम ही १८४ अब्ज येन म्हणजे २२ अब्ज अमेरिकी डॉलर इतकी असणार आहे. जपानचे पंतप्रधान नोडा यांनी असेही नमूद केले की, अति वेगवान रेल्वेसाठी भारताला सल्लासेवा देण्यात जपानला स्वारस्य आहे.    

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Japan gives 22 crores dollers loan to india