जपानची राजधानी टोक्योमधील हानेडा विमानतळावर मोठी विमान दुर्घटना झाली आहे. धावपट्टीवर तटरक्षक दल आणि जपान एअरलाईन्सच्या प्रवासी विमानाची धडक झाली आहे. या धडकेनंतर प्रवासी विमानाने पेट घेतला. धावपट्टीवर पेटणारं विमान पाहून अनेकांचा थरकाप उडाला होता. जपानच्या परिवहन आणि पर्यटन मंत्रालयाने याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रवासी विमानात ३७९ लोक (प्रवासी आणि क्रू) होते. विमानाला आग लागल्यानंतर विमान थांबवून सर्व प्रवाशांसह क्रूमधील सदस्य तसेच पायलट्सना सुरक्षित विमानाबाहेर काढण्यात आलं आहे. त्यामुळे कुठलीही जीवितहानी झाली नाही. विमानाला लागलेली आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या ७० गाड्यांचा ताफा मागवण्यात आला होता. काही तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ही आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरम्यान, तटरक्षक दलाच्या विमानाचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. या अपघातानंतर तटरक्षक दलाने म्हटलं आहे की, आमच्या विमानातील चालक दलातील पाच सदस्य सध्या बेपत्ता आहेत. अपघातानंतर पायलटला सुरक्षित बाहेर काढलं आहे.

जपानमधील न्यूज ब्रॉडकास्टर एनएचकेने म्हटलं आहे की, अपघात झाला तेव्हा प्रवासी विमानात ३७९ जण होते, तर तटरक्षक दलाच्या विमानात पायलटसह एकूण सहाजण होते. परंतु, अपघातानंतर केवळ पायलटला बाहेर काढलं. इतर पाच जण बेपत्ता आहेत. तर प्रवासी विमानातील आठ लहान मुलं, दोन्ही पायलट, चालक दलालीत सदस्य तथा क्रू मेंबर्स असे मिळून १२ जण आणि सर्व प्रवासी मिळून ३७९ जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं आहे.

जपान एअरलाईन्सच्या प्रवासी विमानाच्या उड्डाणाआधीच ही धडक झाली आणि विमानाने पेट घेतला. व्हिडीओमध्ये दिसतंय की, विमानाच्या पुढच्या भागाने पेट घेतला आहे. तसेच विमानतळावर विमानाचे काही पेटते भाग पडल्याचं दिसत आहे.

हे ही वाचा >> VIDEO : टोक्योमधील हानेडा विमानतळावर दोन विमानांची धडक, ३७९ प्रवाशांना घेऊन जाणारं विमान पेटलं

गेल्या ३८ वर्षांत जपानध्ये अशी मोठी विमान दुर्घटना झालेली नाही. याआधी १९८५ मध्ये टोक्योहून ओसाकाला जाणाऱ्या JAL जंबो जेटचा मध्य गुनमा भागात अपघात झाला होता. या दुर्घटनेत ५२० प्रवासी दगावले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Japan plane collision 5 coast guard crew member missing after japan airlines plane in flames on runway asc
Show comments