Japan PM Kishida attacked : जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. पोटनिवडणुकीच्या प्रचारात ते भाषणाला सुरुवात करणार होते, त्याआधीच पाईप बॉम्ब त्यांच्या दिशेने फेकण्यात आला. मात्र, सुरक्षा रक्षकांनी तत्काळ पावलं उचलल्याने बॉम्बचा स्फोट होण्याआधीच फुमियो किशिदा यांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं. वाकायामा येथे पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी ते आले होते.
हेही वाचा >> नागालँड नागरिक हत्याकांड प्रकरण : ३० जवानांवर खटल्यास केंद्राचा नकार
स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा हे लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवारासोबत बोलत उभे होते. तेवढ्यात त्यांच्या दिशेने एक पाईप बॉम्ब फेकण्यात आला. परंतु, तो फुटण्याआधीच किशिदा यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. याठिकाणी स्फोटासारखा मोठा आवाज आल्याचंही प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. आवाज आल्याने उपस्थितांमध्ये गोंधळ निर्माण झाला. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतील दृश्यानुसार सभेसाठी आलेले लोक इतरत्र सुरक्षित जागा शोधण्यासाठी धावाधाव करताना दिसत आहेत. दरम्यान, हा हल्ला झाल्याने किशिदा यांचे येथील भाषण रद्द करण्यात आले. तसंच, फुमियो किशिदा सुखरूप असून त्यांना कोणतीही इजा झाली नसल्याचंही सांगण्यात आलं आहे.
गोळीबारात शिंजो आबे यांचा मृत्यू
गेल्या वर्षी जुलै महिन्यातही असाच हल्ला झाला होता. या हल्ल्यात माजी पंतप्रधान शिंजो आबे यांना गोळ्या घालून ठार मारण्यात आले होते. यावेळीही सार्वत्रिक निवडणुकीकरता ते प्रचार करत होते. यावेळी भर प्रचारसभेत शिंजो आबे यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. या घटनेनंतर पंतप्रधानांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. असे असतानाही आज पुन्हा पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्यावर हल्ला झाला आहे.