दोन दिवस सातत्याने जपानला नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागत आहे. गुरूवारी जपानच्या उत्तरेतील द्वीप होक्काइडो भूकंपाच्या तीव्र धक्क्याने हादरलं. रिश्टर स्केलवर 6.7 इतकी या भूकंपाची तीव्रता होती. भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून आतापर्यंत दोन जणांचा मृत्यू झाला आहे, तर जवळपास 40 जण बेपत्ता झाले आहेत. भूकंपानंतर त्सुनामीचा इशारा देण्यात आलेला नसल्याची माहिती बीबीसीने दिली आहे. यामध्ये अनेकजण जखमीही झाले आहेत, पण जखमींची नेमकी संख्या अद्याप समजू शकलेली नाही.

होक्काइडोमध्ये भूकंपाच्या तीव्र धक्क्यानंतर भूस्खलन झाले, यामध्ये 40 हून जास्त जण बेपत्ता झाल्याचं वृत्त येथील माध्यमांनी दिलं आहे. होक्काइडोचे मुख्य शहर सप्पोरो येथून 68 किमी भूकंपाचा केंद्रबिंदू होता. भूकंपामुळे मेट्रो सेवेवर आणि वीज पुरवठ्यावर परिणाम झाला आहे, तसंच होक्काइडो आणि न्यू चिटोस विमानतळांचंही नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

यापूर्वी मंगळवारीच गेल्या २५ वर्षातील सर्वात शक्तीशाली टाइफून जेबी नामक वादळाचा तडाखा बसला. यात काही जणांना आपला जीव गमवावा लागला तर अनेकांवर बेघर होण्याची वेळ आली. पश्चिम भागातील क्योटो आणि ओसाका या शहरांना याचा जास्त तडाखा बसला. वादळात अडकेल्या १.२ दशलक्षांहून अधिक लोकांना मंगळवारी सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.