पंतप्रधान नरेंद्र मोदी २ दिवसीय जपान दौऱ्यावर आहेत. टोकियोमध्ये दाखल होताच मोदींचं जपानमधील भारतीय नागरिकांसह जपानच्या नागरिकांनी उत्साहाने स्वागत केलं. यात लहान शाळकरी मुलांचाही समावेश होता. यातील एका मुलाने स्वतःची ओळख हिंदीत करून दिली आणि जपानमध्ये स्वागत असल्याचं म्हटलं. यावर पंतप्रधान मोदींनी या जपानी मुलाच्या हिंदीचं कौतुक केलं. तसेच तू हिंदी कुठे शिकलास? असा प्रश्न करत विचारणा केली. मोदींनी यावेळी या जपानी मुलाला आपला ऑटोग्राफ देखील दिला.
पंतप्रधान मोदी टोकियोतील आपल्या हॉटेलच्या ठिकाणी आले तेव्हा तेथे अनेकांनी त्यांचं स्वागत केलं. काही शाळकरी मुलांनी स्वतःच्या हाताने पेटिंग काढून आणली. यातील एका जपानी मुलाने तिरंग्याचं चित्र काढलं. त्यावर तीन भाषांमध्ये लिहिलं होतं. आपल्या हातात हे पोस्टर घेऊन या जपानी मुलाने मोदींना हिंदीत त्याची ओळख करून दिली. नाव, शाळा अशी माहिती दिल्यावर जपानमध्ये तुमचं स्वागत आहे असं जपानी मुलगा म्हणाला. यावर मोदींनी कौतुकाने त्याची पाठ थोपटली.
व्हिडीओ पाहा :
या जपानी मुलाने मोदींकडे त्यांचा ऑटोग्राफही मागितला. यानंतर मोदींनी ऑटोग्राफ देताना जपानी मुलाचं चित्र बारकाईने पाहिलं. त्यावरील तिरंगा आणि तीन भाषेतील लिखाण मोदींना आवडलं. त्यासाठी त्यांनी या मुलाचं कौतुक केलं. तसेच कुतुहलाने तू हिंदी कुठे शिकला अशी विचारणाही केली.
“मला फार जास्त हिंदी बोलता येत नाही, मात्र समजते”
पंतप्रधान मोदींच्या कौतुकानंतर माध्यमांशी बोलताना विझुकी नावाचा पाचव्या इयत्तेतील हा विद्यार्थी म्हणाला, “मला फार जास्त हिंदी बोलता येत नाही. मात्र, मला हिंदी समजते. पंतप्रधान मोदींनी माझ्या पेटिंगवरील माझा संदेश वाचला. तसेच त्यांनी मला ऑटोग्राफही दिला. मी खूप आनंदी आहे.”
हेही वाचा : “आकडेवारीच्या जंजाळात नागरिकांना अडकवून…”; केंद्राच्या इंधन दरकपातीवरुन मुख्यमंत्र्यांची टीका
पंतप्रधान मोदी आपल्या दोन दिवसीय जपान दौऱ्यात क्वाड संमेलनात सहभागी होणार आहेत. याशिवाय ते इतरही कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत.