परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही. के. सिंग यांनी अकबर रोडचे नाव बदलण्याची मागणी केल्यावरून गीतकार जावेद अख्तर यांनी त्यांच्यावर निशाणा साधला. संसदीय कार्य मंत्री वेंकय्या नायडू यांच्याकडे गेल्या महिन्यात व्ही. के. सिंग यांनी नवी दिल्लीतील अकबर रोडचे नाव बदलून महाराणा प्रताप करण्याची मागणी केली होती. मुघल बादशाह अकबराच्या वाढत्या साम्राज्याला थोपविण्यात महाराणा प्रताप यांची महत्वाची भूमिका होती. महाराणा प्रताप हे खरोखरी धर्मनिरपेक्ष आणि सामान्य जनतेचे राजे होते, असे त्यांनी आपल्या पत्रात म्हटले होते.
व्ही. के. सिंग यांना इतिहासाचे कमी ज्ञान असल्याने त्यांना माफ करायला हवे. बिचारे, त्यांना तर त्यांची स्वत:ची जन्मतारीखही माहिती नाही, अशी टीका करत टि्वटरच्या माध्यामातून जावेद अख्तर यांनी सिंग यांच्यावर निशाणा साधला.
Please forgive VK singh for his total ignorance of history . Poor fellow doesn't know even his own date of birth .
— Javed Akhtar (@Javedakhtarjadu) June 3, 2016
रस्त्याचे नामांतर केल्याने महाराणा प्रताप यांचा योग्य सन्मान होईल, असे देखील सिंह म्हणाले होते. धर्मनिरपेक्षतेच्या त्यांच्या सिध्दांतांना योग्य ओळख मिळेल, ज्यामुळे आपला देश महान होईल. महाराणा प्रताप आणि शिवाजी महाराज ज्या सन्मानाचे अधिकारी आहेत तो सन्मान त्यांना अद्याप मिळाला नसल्याची भावना त्यांनी व्यक्त केली होती.
सिंग यांच्याव्यतिरिक्त भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी आणि हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनीदेखील अकबर रोडचे नामांतर करण्याचा सूर लावला होता. निर्भीड महाराणा प्रताप बाह्य ताकदींसमोर कधीही झुकले नाहीत. ज्या राजाने एवढा त्याग केला त्या राजाचे नाव रस्त्याला देणे हा त्यांचा सन्मान असेल, अशी भावना स्वामी यांनी व्यक्त केली होती.