सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधातील आंदोलनांनी जोर पकडल्यानंतर पाकिस्तानी शायर फैज अहमद फैज यांच्या एका कवितेवरून एक नवाच वाद उभा राहिला आहे. फैज यांची ‘लाजिम है कि हम भी देखेंगे’ ही कविता हिंदू विरोधी असल्याचा आरोप करण्यात आला. या आरोपाची चौकशीही सुरू झाली असून, प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी या घटनेवर नाराजी व्यक्त केली आहे. “फैज यांची कविता हिंदू विरोधी असल्याचं सांगणं म्हणजे हास्यास्पद आहे”, अशा शब्दात अख्तर यांनी टीका केली आहे.
सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधात आयआयटी कानपूर येथे झालेल्या आंदोलनादरम्यान ही कविता म्हटली होती. त्याविरोधात एका प्राध्यापकानं तक्रार केल्यानंतर प्रशासनानं चौकशी समिती नेमली आणि नवा वाद सुरू झाला. आयआयटी कानपूर प्रशासनाचा चौकशी करण्याचा निर्णय गीतकार जावेद अख्तर यांनी चुकीचा ठरवला आहे. अख्तर यांनी ट्विट करुन भूमिका मांडली आहे.
#WATCH Javed Akhtar:Calling Faiz Ahmed Faiz ‘anti-Hindu’ is so absurd&funny that its difficult to seriously talk about it.He lived half his life outside Pakistan,he was called anti-Pakistan there.’Hum Dekhenge’ he wrote against Zia ul Haq’s communal,regressive&fundamentalist Govt pic.twitter.com/nOtFwtfjQ9
— ANI (@ANI) January 2, 2020
“या कवितेमध्ये कोणतीही ओळ ही हिंदू विरोधी नाही. ही कविता पाकिस्तानमधील हुकूमशाही विरोधात लिहिली गेली होती. फैज अहमद फैज यांनी जिया उल हक यांच्या सरकारविरोधात ती लिहिली होती. ज्यावेळी भारत स्वतंत्र झाला, त्यावेळीदेखील त्यांनी कविता लिहिल्या होत्या. देशाचं विभाजन झाल्यामुळे दु:खही व्यक्त केलं होतं. असं असतानादेखील आज त्यांच्या कवितांना हिंदू विरोधी म्हटलं जात आहे,” असं म्हणत जावेद अख्तर यांनी नाराजी व्यक्त केली.”सध्या या कवितेवरुन जो वाद सुरु आहे. निव्वळ निरर्थक आणि हास्यास्पद आहे. फैज यांच्या कवितेला हिंदूविरोधी असं म्हणणं अत्यंत चुकीचं आहे. या प्रकरणी गंभीरपणे चर्चा करणं गरजेचं आहे,” असं आवाहन त्यांनी केलं आहे.
प्राध्यापकाच म्हणणं काय?
सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं होतं. यावेळी विद्यार्थ्यांवर लाठीमार करण्यात आला. याचे पडसाद देशभरात उमटले आणि आयआयटी कानपूर येथील विद्यार्थ्यांनी जामिया मिलियाच्या विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ आंदोलन केले. त्यावेळी फैज यांची कविता गायली होती. त्यावर एका प्राध्यापकानं आक्षेप घेतला आणि ही कविता हिंदूविरोधी असल्याची प्रशासनाकडे तक्रार केली होती. त्यानंतर वादाता तोंड फुटले.