केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी सावरकरांनी गांधीजींच्या सांगण्यावरूनच ब्रिटिशांकडे माफीची याचना केल्याचा दावा केला. यानंतर अनेक स्तरातून प्रतिक्रिया उमटल्या. आता प्रसिद्ध लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांनी देखील यावर ट्विट करत राजनाथ सिंह यांचा दावा फेटाळला आहे. राजनाथ सिंह यांचा दावा चुकीचा आणि खोटा असल्याचं मत जावेद अख्तर यांनी व्यक्त केलं.
आपल्या ट्विटमध्ये जावेद अख्तर म्हणाले, “सावरकरांनी ब्रिटिशांकडे केलेल्या माफीच्या दोन विनंत्या १९११ आणि १९१३ रोजी करण्यात आल्या. तेव्हा ते काळ्या पाण्याची शिक्षा भोगत होते. त्यावेळी गांधीजी दक्षिण आफ्रिकेत होते. त्यांनी १९१५ मध्ये भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला. त्यामुळे सावकरकरांनी गांधीजींमुळे ब्रिटिशांकडे माफी मागितली हे खोटं आहे.”
“सावकरकरांनी गांधींनी सांगितल्यानं ब्रिटिशांकडे माफी मागितली हा दावा करून केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह गांधींकडून सावरकरांसाठी थोडी प्रतिष्ठा मिळवू पाहत आहेत. मात्र, याचा काहीही उपयोग होणार नाही,” असंही जावेद अख्तर यांनी नमूद केलंय.
राजनाथ सिंह काय म्हणाले होते?
सावरकर यांनी महात्मा गांधींच्या सूचनेवरून अंदमान तुरुंगात कैद असताना ब्रिटीशांकडे दया याचिका दाखल केली होती, पण स्वातंत्र्य संग्रामातील त्यांचे योगदान काही विचारसरणीच्या लोकांनी बदनाम केले आणि ते आता सहन केले जाणार नाही, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं होतं. ‘वीर सावरकर: द मॅन हू कॅन प्रिव्हेंट पार्टिशन’ या उदय माहूरकर आणि चिरायू पंडित यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यावेळी राजनाथ सिंह बोलत होते. रूपा पब्लिकेशन्सने हे पुस्तक प्रकाशित केले आहे.
राजनाथ सिंह म्हणाले, “सावरकरांच्या विरोधात खूप खोटे बोलले गेले आहे. त्यांनी ब्रिटिश सरकारपुढे अनेक दया याचिका दाखल केल्या हे वारंवार सांगितले गेले. त्यांनी त्यांच्या सुटकेसाठी या याचिका दाखल केल्या नाहीत. सामान्यत: कैद्याला दया याचिका दाखल करण्याचा अधिकार असतो. तुम्ही दया याचिका दाखल करा, असे महात्मा गांधी म्हणाले होते. गांधींच्या सूचनेवरूनच त्यांनी दया याचिका दाखल केली. आणि महात्मा गांधींनी सावरकरांना सोडण्याचे आवाहन केले होते. गांधीजी ज्या प्रकारे आम्ही शांततेने स्वातंत्र्याची चळवळ चालवत आहोत, सावरकर तेच करतील असे म्हणाले होते.”
व्हिडीओ पाहा :
यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक सेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनीही मेळाव्याला संबोधित केले. भागवत म्हणाले की, सावरकर कठोरपणे बोलले म्हणून लोकांचा गैरसमज झाला. पण जर संपूर्ण भारत त्यांच्यासारखे बोलला असता तर देशाला फाळणीला सामोरे जावे लागले नसते असा युक्तिवाद मोहन भागवत यांनी यावेळी केला. मोगल सम्राट औरंगजेब सारख्या व्यक्तींच्या नावावर रस्त्यांची नावे ठेवू नयेत या मताशीही ते सहमत होते असेही भागवत म्हणाले.