सुप्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी सोमवारी केलेलं एक ट्वीट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी गिटहब या अॅपवर मुस्लीम महिलांबद्दल अपमानजनक मजकूर पोस्ट केल्याचा निषेध केला होता. तसेच, मध्य प्रदेशातील धर्मसंसदेचा देखील निषेध केला होता. या पार्श्वभूमीवर ट्वीटवरून त्यांना ट्रोल करणाऱ्यांवर जावेद अख्तर चांगलेच भडकले आहेत. त्यांनी यासंदर्भात आज सकाळी दुसरं ट्वीट करून त्याबद्दल आपला संताप व्यक्त केला आहे.
काय म्हणाले जावेद अख्तर?
आपल्या ट्वीटमध्ये जावेद अख्तर म्हणतात, “ज्या क्षणी मी महिलांच्या ऑनलाईन लिलाव प्रकरणावर भूमिका मांडली, (नथुराम) गोडसेचा उदोउदो करणाऱ्यांना विरोध केला, एका विशिष्ट धर्माविरोधात नरसंहाराची शिकवण देणाऱ्यांविरोधात मत व्यक्त केलं त्या क्षणी काही धर्मांध व्यक्तींनी माझ्या खापर पणजोबांना शिवीगाळ करायला सुरुवात केली. ते स्वातंत्र्यसेनानी होते. काळ्या पाण्याची शिक्षा भोगताना १८६४ मध्ये त्यांचं निधन झालं. अशा (ट्रोलर्स) मूर्खांना तुम्ही काय म्हणाल?” असं जावेद अख्तर ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.
कोणत्या ट्वीटवरून ट्रोल होतायत जावेद अख्तर?
जावेद अख्तर यांनी सोमवारी केलेल्या एका ट्वीटवरून ट्रोलिंग सुरू झालं आहे. यामध्ये त्यांनी नुकत्याच समोर आलेल्या एका प्रकरणावर बोट ठेवलं आहे ज्यात गिटहब नावाच्या अॅपवर मुस्लीम महिलांची बदनामी करण्यात येत आहे. “एकीकडे शेकडो महिलांना ऑनलाईन लिलाव सुरू आहे, दुसरीकडे तथाकथिक धर्मसंसद भरतेय जिधे लष्कर, पोलीस आणि लोकांना देशातील अल्पसंख्याक लोकांची हत्या करण्यास सांगितलं जातंय. या सर्व प्रकरणांवर माझ्यासकट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर सर्वांच्या मौनाची भिती वाटतेय. हाच का सब का साथ?” असं जावेद अख्तर आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले होते.
कंगनाला सत्र न्यायालयाचा तडाखा ; जावेद अख्तर यांची तक्रार वर्ग करण्यास नकार
दरम्यान, त्यांच्या या ट्वीटनंतर ट्रोलर्सनी त्यावर आक्षेप घ्यायला सुरुवात केली. धर्मसंसदेवर भाष्य करताना देशातील इतर गोष्टींवर का मौन बाळगलं? असे सवाल जावेद अख्तर यांच्यावर उपस्थित करण्यात आले. त्यांच्या खापर पणजोबांना देखील लक्ष्य करण्यात आलं. यानंतर जावेद अख्तर यांनी ट्वीट करत आपला संताप व्यक्त केला आहे.