पीटीआय, नवी दिल्ली : भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त त्यांना काँग्रेसने सोमवारी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या अतुलनीय योगदानाच्या कृतज्ञ स्मरणाशिवाय २१ व्या शतकातील भारताची कल्पना केली जाऊ शकत नाही. २०१४ नंतर नेहरूंचे महत्त्व, औचित्य वाढल्याचे काँग्रेसने स्पष्ट केले.
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, माजी पक्षाध्यक्ष व ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, अखिल भारतीय काँग्रेस समितीचे प्रमुख के. सी. वेणुगोपाल आदींसह अनेक नेत्यांनी नवी दिल्लीतील नेहरू स्मृती स्मारक शांतिवन येथे पुष्पांजली अर्पण केली. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी हिंदीत केलेल्या ‘ट्वीट’मध्ये म्हंटले, की भारतमाता म्हणजे कोण? या विस्तीर्ण देशात व्यापलेली कोटी-कोटी जनता म्हणजेच भारतमाता! पंडित नेहरूंनी माझ्या हृदयात लोकशाही, विकासात्मक आणि धर्मनिरपेक्ष मूल्ये रुजवली. त्यानुसार ‘हिंदूचे जवाहर’यांच्या भारतमातेचे रक्षण करण्यासाठीची माझी वाटचाल सुरू आहे. पं. नेहरूंना आदरांजली वाहताना काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी ‘ट्विटर’वर नेहरूंचे वचन उद्धृत करताना नमूद केले, की आपल्याला अशा स्वतंत्र भव्य भारताची उभारणी करायची आहे, जेथे त्याची सर्व मुले मुक्तपणे वास्तव्य करू शकतील. काँग्रस नेते शशी थरूर यांनी ‘ट्वीट’ केले, की नेहरूंना संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात आदरांजली वाहण्यासाठी सोमवारी झालेल्या सोहळय़ात भाजपचा कोणताही मंत्री अथवा मोठा नेता उपस्थित नव्हता.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी ‘ट्वीट’मध्ये नमूद केले, की आधुनिक भारताचे निर्माते पंडित नेहरू यांच्याशिवाय २१ व्या शतकातील भारताची जडणघडणे होणे शक्य नव्हते. यासाठी नेहरूंचे अतुलनीय योगदान आहे. लोकशाहीवर प्रगाढ श्रद्धा असलेल्या नेहरूंच्या प्रगत दृष्टिकोनामुळे अनेक खडतर आव्हाने असतानाही भारताची सामाजिक, राजकीय आणि आर्थिक प्रगती होऊ शकली. या सच्च्या देशभक्तास माझी विनम्र आदरांजली.
काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी नमूद केले, की भारत जोडो यात्रा हिंगोली जिल्ह्यात आहे. योगायोगाने इंग्रजी-हिंदीशिवाय मराठीत नेहरूंवरील पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. नेहरूंची बदनामी करणे, त्यांच्याविषयी विकृत पद्धतीने माहिती पसरवण्याचे काम सुरूच राहिले तरी, पंडित नेहरू हे आम्हा सर्वाना सतत प्रेरणा देत राहतील. विशेषत: २०१४ नंतर त्यांच्या समयोचिततेचे महत्त्व ठळकपणे अधोरेखित झाले आहे. २०१४ नंतर आलेल्या मोदी सरकारवर त्यांचा रोख होता. ‘भारत जोडो यात्रे’त सहभागी झालेल्यांना प. नेहरूंच्या गाजलेल्या ‘द डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ ग्रंथाच्या ६०० प्रती वाटण्यात येणार आहेत. या प्रती एका स्वयंसेवकाने दिल्लीतून २३ तासांचा सलग प्रवास करत यात्रास्थळी आणल्या आहेत.
काँग्रेसने ‘ट्विटर’वर म्हटले, की पं. नेहरू हे एक समाजवादी लोकशाहीचे समर्थक होते. त्यांनी कल्याणकारी राज्याचे स्वप्न बाळगले होते. ते मानवतावादी-धर्मनिरपेक्षतावादी होते. त्यांनी कृषी-विज्ञानासह सर्व आघाडय़ांवर राष्ट्रीय विकासासाठी प्रयत्न केले. आज त्यांच्या जयंतीनिमित्त, आम्ही त्यांच्या प्रिय वारशाच्या स्मृतींना उजाळा देतो.
मोदींकडून नेहरूंच्या योगदानाचे स्मरण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी जवाहरलाल नेहरूंना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली व त्यांनी देशासाठी दिलेल्या योगदानाचे स्मरण केले. सर्वाधिक काळ पंतप्रधानपद भूषवणाऱ्या पं. नेहरूंना आदरांजली वाहताना मोदींनी ‘ट्वीट’ केले, की जयंतीनिमित्त आमचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना विनम्र आदरांजली. देशासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचे आम्ही स्मरण करतो.