शोकाकुल मुलीचा गृहमंत्र्यांना सवाल
विमान अपघातात जीव गमवावा लागलेल्या सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांच्या कुटुंबीयांनी आपल्या आप्तांच्या मृत्यूवरून केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांना धारेवर धरले. अशा अपघातांमध्ये फक्त जवानच कसे मरतात, व्हीआयपींवर असे प्रसंग कसे ओढवत नाहीत, असा संतप्त सवाल या अपघातात पिता गमावलेल्या मुलीने राजनाथ यांना केला.
नवी दिल्लीतील इंदिरा गांधी विमानतळावरून रांची येथे जाणाऱ्या ‘बीएसएफ’च्या २० वर्षे जुन्या अकरा आसनी विमानाला द्वारका येथे अपघात झाला. त्या अपघातात ‘बीएसएफ’चे दहा जवान मृत्युमुखी पडले. त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी या जवानांचे कुटुंबीय सफदरजंग विमानतळावर जमले होते. त्यावेळी या जवानांच्या शोकाकुल आप्तांनी राजनाथ यांना अपघातग्रस्त विमानाच्या जुनेपणावरून धारेवर धरले.
जुनी विमाने वापरून जवानांचे आयुष्य का धोक्यात लोटण्यात येते? अशा अपघातांमध्ये केवळ जवानच कसे काय मरतात, व्हीआयपींवर असे प्रसंग कसे ओढवत नाहीत, असा प्रश्न या अपघातात मरण पावलेले उपनिरीक्षक रवींद्रकुमार यांच्या मुलीने राजनाथ यांना विचारला. त्यावेळी राजनाथ यांनी तिचे सांत्वन करत तिने उपस्थित केलेल्या प्रश्नांची दखल घेण्याचे आश्वासन दिले. अपघातग्रस्त विमानाचे सहवैमानिक राजेश शिवनारायण यांचे सासरे म्हणाले की, माझ्या जावयाने ‘बीएसएफ’ची विमाने जुनी होत चालल्याचे आणि नवी ताफ्यात दाखल होणार असल्याचे सांगितले होते. ही नवी विमाने कधी येतील, याची कल्पना नाही. परंतु, ती पाहण्यासाठी माझा जावई नसेल.
मृत्यू पावलेल्यांच्या नातेवाईकांनी जुन्या होत चाललेल्या विमानांबद्दल राजनाथ यांच्यासह ‘बीएसएफ’चे महासंचालक डी. के. पाठक यांच्यावरही टीकेचा भडीमार केला. हे विमान वीस वर्षे जुने असले, तरी अशा विमानांचे आयुष्य ४०-४५ वर्षे इतके असते, अशा शब्दांत अपघातग्रस्त विमान नादुरुस्त असल्याचा आरोप पाठक यांनी नाकारला. या अपघाताच्या चौकशीचे आदेश नागरी हवाई वाहतूक संचालनालयाला देण्यात आले आहेत.