अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी सामना करत सनदी लेखापाल (सी.ए.) च्या परीक्षेत देशभरात पहिला क्रमांक पटकावणाऱ्या प्रेमा जयकुमार हिच्या देदीप्यमान यशाची तोंडभरून स्तुती करताना तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी तिला राज्य सरकारतर्फे १० लाख रुपयांचे बक्षीस गुरुवारी जाहीर केले.
कठीण परिस्थितीचा सामना करत प्रेमाने यश संपादन केले आहे. मूळच्या तामिळनाडूच्या असलेल्या प्रेमाच्या यशामुळे राज्याचा नावलौकिक वधारला आहे. तिने प्राप्त केलेल्या यशाबद्दल मी तिचे मन:पूर्वक अभिनंदन करते, असे जयललिता यांनी म्हटले आहे.
पुढील शैक्षणिक कारकीर्दीत तिला असेच यश प्राप्त होवो, अशी इच्छा व्यक्त करताना जयललिता यांनी तला १० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले. द्रविड मुन्नेत्र कलघम (द्रमुक)चे अध्यक्ष एम. करुणानिधी आणि केंद्रीय मंत्री व काँग्रेस नेते जी. के. वास्सन यांनी याअगोदरच प्रेमा जयकुमार हिस रोख पारितोषिक जाहीर केले आहे.
मूळची तामिळनाडूची असलेली प्रेमा कुटुंबीयांसह मालाड येथील एका चाळीत राहते. उपजीविकेसाठी गेल्या काही वर्षांपासून त्यांचे वास्तव्य मुंबईतच आहे. प्रेमाचे वडील जयकुमार पेरुमल हे रिक्षाचालक आहेत.

Story img Loader