समाजवादी पक्षाच्या खासदार आणि ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन या सोमवारी राज्यसभेत प्रचंड संतापल्याचं पाहायला मिळालं. त्यांचा संताप एवढा अनावर झाला की त्यांनी थेट केंद्र सरकारला “वाईट दिवस लवकरच येतील”, असा शापच देऊन टाकला! जया बच्चन यांच्या या संतापाचा संबंध थेट मुंबईत अभिनेत्री ऐश्वर्या रायची ईडीनं चौकशी करण्याशी देखील जोडला गेला. मात्र, आता खुद्द जया बच्चन यांनीच आपल्या संतापाचं कारण स्पष्ट करत आपण राज्यसभेत सरकारला का शाप दिला, याचं स्पष्टीकरण दिलं.
“..तोही एक शापच असतो!”
“तुम्ही मला सांगा की माणूस शाप केव्हा देतो? सभागृहात बसलेले आम्ही सगळे लोकांचे प्रतिनिधी आहोत. आम्ही शुभेच्छा देऊ शकतो. पण ह्रदयात फार दु:ख, वेदना असतात, तेव्हा आपण शाप देतो. ही आपल्या भारताची परंपरा असते. ट्रकच्या मागे म्हटलं असतं ना, की बुरी नजर वाले, तेरा मुँह काला.. तो सुद्धा एक शापच आहे”, असं जया बच्चन एबीपीशी बोलताना म्हणाल्या.
“प्रियांका चतुर्वेदी कुणाचा गळा धरणार?”
दरम्यान, १२ खासदारांच्या निलंबनाच्या मुद्द्यावरून विचारलेल्या प्रश्नावर जया बच्चन यांची खोचक सवाल केला. “आम्ही विरोधी पक्षाची लोकं मिळून बोलत होतो. योग्य प्रकारे योग्य मुद्द्यावर चर्चा व्हायला हवी असं आमचं मत होतं. आमचे १२ खासदार महिन्याभरापासून बाहेर बसले आहेत. त्यावर बोला. आम्ही स्वत: प्रत्यक्षदर्शी होतो. आम्हाला माहितीये कुणी काय केलं ते. तुम्ही जे काही सभागृहात म्हणाल, की गळा वगैरे धरला. कुणाचाही गळा धरला नाही. आता प्रियांका चतुर्वेदी कुणाचा गळा धरणार तुम्ही सांगा. एकतर सगळ्यांपेक्षा त्या उंच आहेत”, असं जया बच्चन म्हणाल्या.
का भडकल्या जया बच्चन?
यावेळी बोलताना जया बच्चन यांनी राज्यसभेत आपण का संतापलो, याविषयी स्पष्टीकरण दिलं. “मला त्यांच्या वागणुकीमुळे, त्यांच्या भूमिकेमुळे संताप आला”, असं त्या म्हणाल्या.
“मी तुम्हाला शाप देते, लवकरच तुमचे वाईट…”, जया बच्चन केंद्र सरकारवर भडकल्या, राज्यसभेतच केली आगपाखड!
काय झालं होतं राज्यसभेत?
सोमवारी राज्यसभेत भाजपा खासदार जुगल लोखंडवाला यांनी जया बच्चन यांना उद्देशून काहीतरी टिप्पणी केली. यामुळे गोंधळ अजूनच वाढला आणि जया बच्चन यांचा पारा त्याहून जास्त वाढला. “ते माझ्यावर वैयक्तिक टिप्पणी कशी करू शकतात? ही फार वाईट बाब आहे की तुमच्यामध्ये थोडाही सेन्स नाही आणि बाहेर बसलेल्या आपल्या सहकाऱ्यांबाबत थोडाही सन्मान नाही”, असं जया बच्चन म्हणाल्या.
यावेळी बोलताना जया बच्चन यांनी रागाच्या भरात “तुम्हा लोकांचे वाईट दिवस फार लवकर येणार आहेत, मी तुम्हाला शाप देते”, असं म्हटलं. यामुळे सभागृहातला गोंधळ अजूनच वाढला. त्यामुळे सभापतींनी लागलीच कामकाज काही काळासाठी तहकूब केलं.