Jaya Bachchan : भाजपाचे खासदार प्रताप सारंगी यांनी राहुल गांधींनी आपल्याला धक्काबुक्की केली आणि त्यामुळे मी खाली पडलो असा आरोप केला होता. त्यांना रुग्णालयातही दाखल करण्यात आलं होतं. दुसरीकडे अभिनेत्री, राज्यसभेच्या सपाच्या खासदार जया बच्चन यांनी मात्र भाजपाच्या दोन्ही खासदारांवर टीका केली आहे. पट्टीचे कलाकार आहेत त्यांना पुरस्कार द्या असं जया बच्चन यांनी सुनावलं आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात राजकीय गरमागरमी पाहण्यास मिळते आहे.
धक्काबुक्कीचं नेमकं प्रकरण काय आहे?
गुरूवारी दिल्ली पोलिसांनी संसद परिसरातील धक्काबुक्की प्रकरणात राहुल गांधी यांच्याविरोधात FIR दाखल करण्यात आला. राज्य घटनेचे निर्माते बी. आर. आंबेडकर यांचा अपमान केल्या प्रकरणात गुरुवारी संसद भवनाच्या मकर द्वार या ठिकाणी असलेल्या पायऱ्यांवर सत्ताधरी आणि विरोधक एकमेकांसमोर आले होते. त्यावेळी एकमेकांविरोधात त्यांनी जोरदार नारेबाजी केली. त्यावेळी खासदारांमध्ये धक्का-बुक्की केली. त्यात माजी मंत्री प्रताप चंद्र सारंगी आणि लोकसभा सदस्य मुकेश राजपूत जखमी झाले. प्रताप सारंगीनी या प्रकरणी राहुल गांधींवर आरोप केला आहे. राहुल गांधींनी धक्काबुक्की केल्याने मी जखमी झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. यानंतर सपा खासदार जया बच्चन यांनी सारंगींना टोला लगावला.
राहुल गांधी काय म्हणाले होते?
“आम्ही मकर द्वाराने संसदेच्या आत चाललो होतो. त्यावेळी भाजपाचे काही खासदार उभे होते. त्यांनी आम्हाला आत जाण्यापासून अडवण्याचा प्रयत्न केला. त्यात धक्काबुक्की झाली. हे लोक संविधानावर आक्रमण करत आहेत, तसंच बाबासाहेब आंबेडकरांचा अपमानही भाजपाने केला आहे.” असं राहुल गांधींनी ( Rahul Gandhi ) म्हटलं होतं
मल्लिकार्जुन खरगेंनाही धक्काबुक्की झाली-राहुल गांधी
यानंतर राहुल गांधी म्हणाले मी धक्काबुक्की केलेली नाही. मला धक्काबुक्की करण्यात आली. आम्हाला भाजपाच्या खासदारांनी संसदेत जाण्यापासून अडवलं. राहुल गांधी म्हणाले की आम्हाला धक्काबुक्की करण्यात आली आहे, आम्ही पायऱ्यांवर उभे होतो. जे काही घडलं आहे ते कॅमेरात कैद झालं आहे. मल्लिकार्जुन खरगेंना धक्काबुक्की करण्यात आली. धक्काबुक्की करुन काहीही साध्य होणार नाही. भाजपाचे खासदार हे आम्हाला संसदेत जाण्यापासून रोखू शकत नाहीत असं राहुल गांधी यांनी म्हटलं.
काय म्हणाल्या जया बच्चन?
“प्रताप चंद्र सारंगी हे नाटक करत आहेत. मी माझ्या संपूर्ण जीवनात अद्याप असला अभिनय पाहिलेला नाही. या अभिनयासाठी त्यांना ऑस्कर द्यायलाही काही हरकत नाही. रुग्णालयात उपचार घेत असलेले भाजपाचे खासदार प्रताप सिंह सारंगी हे नाटक करत आहेत.” हे आरोप त्यांनी केले. ते पट्टीचे कलाकार असल्याचा टोला त्यांनी लावला. एवढंच नाही तर सारंगी यांना उत्तम अभिनयाचा पुरस्कार देण्यात यावा असा चिमटा पण त्यांनी काढला.
भाजपाच्या नेत्यांचं जया बच्चन यांना उत्तर
जया बच्चन यांच्या आरोपानंतर आता भाजपाने पलटवार केला आहे. जया बच्चन जे बोलल्या ती इंडिया आघाडीची खरी संस्कृती असल्याचा आरोप भाजपाच्या नेत्यांनी केला. जया बच्चन या पीडित व्यक्तीच्या बाजूने नाहीत तर त्या हल्लेखोरांच्या बाजूने आहेत असंही भाजपा नेत्यांनी म्हटलं आहे.