Jaya Bachchan : महाकुंभमेळ्यात चेंगराचेंगरीची घटना मागील आठवड्यात घडली. या घटनेत ३० भाविकांचा मृत्यू झाल्याची माहितीही समोर आली. मौनी अमावस्येच्या दिवशी ही घटना घडली. अनेक भाविक पवित्र मुहुर्तावर स्नान करण्यासाठी इच्छुक होते. पहाटे तीनच्या दरम्यान अचानक गर्दी वाढली आणि चेंगराचेंगरी झाली. प्रयागराज येथील घटनेबाबत आता जया बच्चन यांनी वादग्रस्त विधान केलं आहे.
काय म्हणाल्या जया बच्चन?
महाकुंभमेळ्याच्या दरम्यान चेंगराचेंगरी झाली. त्यावेळी ज्या भाविकांचा मृत्यू झाला त्यांचे मृतदेह नदीत फेकण्यात आले. ज्यामुळे ते पाणी प्रदुषित झालं. आजही विचाराल की सर्वाधिक दुषित पाणी कुठे तर ते महाकुंभमेळ्यात आहे. कारण त्या ठिकाणी कुठलीही स्वच्छता केली जात नाही. कुंभमेळ्यात जे काही घडलं त्याबद्दल कुणीही काहीही सफाई देत नाही. मृतदेह पाण्यात फेकण्यात आल्याने ते पाणी दुषित झालं आहे. आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत आणि उत्तरही तेच लोक देत आहेत. गरीब आणि कमजोर लोक यांना व्हिआयपी ट्रिटमेंट मिळत नाही. व्हिआयपी लोकांनाच ती ट्रिटमेंट मिळते. सामान्य लोकांसाठी काहीही व्यवस्था नाही. प्रयागराजमध्ये कोट्यवधी लोक आले हे तर धडधडीत खोटं आहे. इतके लोक येतीलच कसे जरा विचार करा असंही जया बच्चन म्हणाल्या.
मृतदेह पाण्यात फेकले आणि…
जया बच्चन पुढे म्हणाल्या, मृतदेह पाण्यात फेकण्यात आल्याने पाणी दुषित झालं आहे. हे पाणी लोकांपर्यंत तसंच पोहचतं आहे. तसंच लोकांचं लक्ष या घटनेकडून विचलित व्हावं म्हणून काळजी घेण्यात आली. मृतदेहांचं शवविच्छेदन होऊ दिलं नाही. ज्या भाविकांचा मृत्यू झाला ते मृतदेह थेट पाण्यात फेकण्यात आले. आता याच भाजपा जलशक्तीवर भाषणं देत आहेत. असाही टोला जया बच्चन यांनी लगावला.
प्रयागराजमध्ये नेमकं काय घडलं?
प्रयागराज येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्याला मागच्या आठवड्यातल्या बुधवारी चेंगराचेंगरीचे गालबोट लागले. ‘मौनी अमावास्ये’साठी संगमावर प्रचंड गर्दी झालेली असताना मध्यरात्रीनंतर दोनच्या सुमारास चेंगराचेंगरी झाली. यात ३० जणांचा मृत्यू झाला असून ६० जण जखमी झाल्याची माहिती उत्तर प्रदेशचे पोलीस महासंचालक वैभव कृष्णा यांनी दिली. दुर्घटना घडून १२ तासांपेक्षा अधिक काळ उलटून गेल्यानंतर, संध्याकाळी आकडेवारी समोर आल्याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान, उत्तरप्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत.
मौनी अमावस्या असल्याने प्रयागराजमध्ये भाविकांची अलोट गर्दी
महाकुंभामध्ये ‘मौनी अमावस्या’ हा संगमस्नानासाठी सर्वांत पवित्र दिवस मानला जातो. यादिवशी साधूसंतांचे दुसरे शाही स्नानही असते. ही पर्वणी साधण्यासाठी सहा ते आठ कोटी भाविक बुधवारी प्रयागराजमध्ये दाखल झाले होते. एवढी गर्दी हाताळण्यासाठी यंत्रणा सज्ज असल्याचा दावा राज्य सरकार आणि महाकुंभ व्यवस्थापनाकडून केला गेला होता. मात्र पहाटे दोनच्या सुमारास संगमस्थळाकडे जाण्यासाठी मोठा लोंढा निघाल्याने चेंगराचेंगरी झाली आणि ३० भाविकांचा मृत्यू झाला. या घटनेबाबत आता खासदार जया बच्चन यांनी वक्तव्य केलं आहे. यावर आता भाजपाकडून काही उत्तर दिलं जाणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.