रेल्वे बोर्डाच्या अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदी जया वर्मा सिन्हा यांची नियुक्ती करण्यात आली असून त्या रेल्वे बोर्डाच्या पहिल्या महिला अध्यक्ष ठरल्या आहेत. जया वर्मा सिन्हा या आयआरटीएस अधिकारी असून त्या रेल्वे बोर्डावर सदस्या होत्या.
हेही वाचा >> रेल्वे बोर्डाला मिळाली पहिली महिला अध्यक्षा, कोण आहेत जया वर्मा-सिन्हा? बालासोर दुर्घटनेनंतर आल्या होत्या चर्चेत!
रेल्वे मंत्रालयाने एक निवेदन काढून याबाबतची माहिती दिली आहे. मंत्रिमंडळ नियुक्त समितीने जया वर्मा यांच्या नियुक्तीला मान्यता दिली आहे, असं या निवदेनात म्हटलं आहे. १ सप्टेंबरपासून त्या पदभार स्वीकारणार आहेत. जया वर्मा १ ऑक्टोबर रोजी निवृत्त होणार आहेत. परंतु, त्यांना त्याच दिवशी पुन्हा नियुक्त केले जाणार असून त्यांचा कार्यकाल ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत असणार आहे.
कोण आहेत जया वर्मा?
बालासोर दुर्घटना झाली तेव्हा जया वर्मा चर्चेत आल्या होत्या. जटिल सिग्नल यंत्रणेचे स्पष्टीकरण त्यांनी दिले होते. जया वर्मा या अलाहाबाद विद्यापीठाच्या माजी विद्यार्थी असून त्या १९८८ साली भारतीय रेल्वे वाहतूक सेवेत सामील झाल्या. त्यांनी उत्तर रेल्वे, एसई रेल्वे आणि पूर्व रेल्वे विभागात काम केलं आहे.
बांगलादेशातील ढाका येथे असलेले भारतीय उच्चायुक्त येथेही चार वर्षे रेल्वे सल्लागार म्हणून काम केलं आहे. कोलकाता ते ढाका या मैत्री एक्स्प्रेसचे उद्घाटनही त्याच कार्यकाळात झाले होते. तसंच, सियालदह विभागातील पूर्व रेल्वेत विभागीय रेल्वे व्यवस्थापक म्हणून त्यांनी काम पाहिलं आहे.