तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची पाचव्यांदा शपथ घेतल्यानंतर रविवारी पहिल्यांदा कार्यालयात आलेल्या जयललिता यांनी यापूर्वी लोकप्रिय ठरलेल्या ‘अम्मा कँटीन’ योजनेंतर्गत २०१ भोजनालये सुरू करण्याची घोषणा केली, तसेच अनेक कल्याणकारी योजनांचा मार्ग मोकळा केला.
पुढील वर्षी निवडणुकांना सामोऱ्या जाणाऱ्या तामिळनाडूच्या मुख्यमंत्री म्हणून शनिवारी शपथ घेतलेल्या जयललिता यांनी दुसऱ्या दिवसापासून फोर्ट सेंट जॉर्ज येथील सचिवालयात येऊन कामाला सुरुवात केली. रस्ते आणि पेयजल सोयींमध्ये सुधारणा करणे आणि महिला कुटुंबप्रमुख असलेल्या गरीब कुटुंबांना मदत करणे यासह एकूण १८०० कोटी रुपयांच्या कल्याणकारी योजनांना त्यांनी मंजुरी दिली.
जयललिता यांनी अनुदानित दरात अन्न पुरवणाऱ्या आणखी २०१ ‘अम्मा’ भोजनालयांचे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन केले. याशिवाय शहर पंचायत भागातील गरिबांसाठी विशेष गृहनिर्माण योजना सुरू करण्यास मंजुरी दिली.