भावी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा येत्या सोमवारी शपथविधी होत असताना या शपथविधी सोहळ्यास कोणाकोणास आमंत्रित करायचे, या मुद्दय़ावरून विरोधी पक्षांकडून टीकाटीप्पणी सुरू झाली आहे. पाकिस्तानचेपंतप्रधान नवाझ शरीफ यांना आमंत्रण दिल्यावरून काँग्रेसने तर श्रीलंकेचे अध्यक्ष महेंद्र राजपक्षे यांना आमंत्रित केल्यावरून तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जे. जयललिता यांनी टीकास्त्र सोडले आहे.
शपथविधी समारंभाला उपस्थित राहण्याबद्दल पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना निमंत्रण पाठविल्याच्या मुद्दय़ावरून काँग्रेसने गुरुवारी भाजपवर जोरदार टीका केली. तसेच भाजपने व्यक्त केलेल्या दहशतवाद आणि चर्चा एकाच वेळी हातात हात घालून पुढे जाऊ शकत नाही या वक्तव्याची आठवणही करून दिली.
जयललिता यांचीही टीका
नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी समारंभास श्रीलंकेचे अध्यक्ष महिंदा राजपक्षे यांना निमंत्रण देण्याचा निर्णय दुर्भाग्यपूर्ण असल्याची टीका तामिळनाडूच्या मुख्यमंत्री आणि एआयएडीएमके पक्षाच्या प्रमुख जयललिता यांनी गुरुवारी केली. राजपक्षे यांना बोलावण्याचा निर्णय म्हणजे तामिळी जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचाच प्रकार असल्याचेही त्या म्हणाल्या.
नवीन सरकार सत्तेत येण्यापूर्वीच त्यांनी श्रीलंकेच्या अध्यक्षांना भारतात बोलावून तामिळी जनतेच्या भावनांना धक्का पोहोचविला आहे. तसेच त्यांच्या खोल जखमांवर मीठ चोळल्याची टीका त्यांनी केली.