जयललिता यांनी शनिवारी तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची पाचव्यांदा शपथ घेतली. जयललिता यांच्यासह त्यांच्या मंत्रिमंडळातील २८ मंत्र्यांनाही शपथ देण्यात आली.
मद्रास विद्यापीठ शताब्दी सभागृहात राज्यपाल के. रोसय्या यांनी जयललिता आणि मंत्रिमंडळातील सदस्यांना शपथ दिली. या वेळी मेगास्टार रजनीकांत तसेत इतर मान्यवर उपस्थित होते.
राष्ट्रगीताचा अवमान?
जयललिता यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी विशिष्ट मुहूर्त निश्चित केला होता. त्यामुळे त्यांच्या शपथविधीपूर्वी राष्ट्रगीताची संक्षिप्त धून वाजविण्यात आली आणि शपथविधी पूर्ण झाल्यानंतर राष्ट्रगीताची संपूर्ण धून वाजविण्यात आली. शपथविधीला सुरुवात होण्यापूर्वी, संक्षिप्त धून वाजविण्यात येणार असल्याचे, जाहीर करण्यात आले होते. समारंभ संपल्यानंतर राष्ट्रगीत पूर्ण स्वरूपात सादर करण्यात आले.
अहवालानंतर निर्णय – सिद्धरामय्या</strong>
नवी दिल्ली:तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांना निर्दोष ठरविण्याच्या कर्नाटक उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणारी याचिका दाखल करण्याबाबतच्या प्रस्तावावर विधी मंत्रालय अभ्यास करीत असून त्यांच्याकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शनिवारी येथे स्पष्ट केले.