अण्णा द्रमुकच्या सर्वेसर्वा जे. जयललिता यांची तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा विराजमान होण्याची औपचारिक प्रक्रिया आज पूर्ण झाली. शनिवारी सकाळी अकरा वाजता त्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. तमिळनाडूचे राज्यपाल के. रोशय्या यांनी जयललिता यांना सत्ता स्थापनेचे निमंत्रण दिले आहे. जयललिता यांनी शुक्रवारी दुपारी रोशय्या यांची भेट घेतली आणि त्यांच्याकडे मंत्रिमंडळात कोणा कोणाचा समावेश करायचा आहे, त्याची यादी सुपूर्द केले. तत्पूर्वी शुक्रवारी सकाळी अण्णा द्रमुकच्या विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत जयललिता यांची नेतेपदी निवड करण्यात आली. गेल्या जवळपास आठ महिन्यांपासून मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळणारे जयललिता यांचे विश्वासू ओ. पनीरसेल्वम यांनी शुक्रवारीच मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला.
बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी कर्नाटक उच्च न्यायालयाने जयललिता यांना निर्दोष ठरविले होते. त्यामुळे त्यांचा मुख्यमंत्रिपदी विराजमान होण्याच मार्ग मोकळा झाला होता. विशेष न्यायालयाने त्यांना दोषी ठरविले होते. मात्र, उच्च न्यायालयाने हा निकाल रद्द करत या प्रकरणात त्यांना निर्दोष ठरविले.
राज्यपालांची भेट घेतल्यानंतर जयललिता यांनी अण्णा द्रमुकचे संस्थापक एम. जी. रामचंद्रन यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. जयललिता यांच्या स्वागतासाठी हजारो चाहते रस्त्याच्या दुतर्फा उभे होते. संपूर्ण चेन्नई शहरात जयललिता यांच्या अभिनंदनाचे पोस्टर्स लागले आहेत.
जयललिता शनिवारी तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार
अण्णा द्रमुकच्या सर्वेसर्वा जे. जयललिता यांची तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा विराजमान होण्याची औपचारिक प्रक्रिया आज पूर्ण झाली.
First published on: 22-05-2015 at 11:10 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jayalalithaa invited to form govt by tamil nadu governor