येरकूड येथे होणाऱ्या निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर पक्षाचा प्रचार करताना कोणत्याही प्रकारची नवीन घोषणा करून आचारसंहितेचा भंग केलेला नाही, असा दावा करीत तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी मंगळवारी निवडणूक आयोगाला दिलेल्या उत्तरात केला आहे. सरकार राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी काय केले याबाबतचे सर्वसाधारण विधान केल्याचे जयललिता यांनी निवडणूक आयोगाला सांगितले.
येरकूड येथे बुधवारी मतदान होणार आहे. या पाश्र्वभूमीवर २८ नोव्हेंबर रोजी आपल्या एआयएडीएमके पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करताना मुख्यमंत्री जयललिता यांनी नवीन योजनांची घोषणा केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. या तक्रारीच्या आधारे केंद्रीय निवडणूक आयोगाने सोमवारी जयललिता यांना नोटीस पाठवून मंगळवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत आपले म्हणणे मांडण्याची सूचना केली होती.   विरोधकांनी हा आरोप हा राजकीय विरोधातून केल्याचे जयललिता यांनी आपल्या उत्तरात म्हटले आहे. राबविलेल्या योजना तसेच सुरू असलेल्या विकासकामांबाबत वक्तव्य केले असून कोणत्याही प्रकारची नवी घोषणा केली नसल्याचे जयललिता यांनी म्हटले आहे.