राष्ट्रीय लोक दलाचे प्रमुख जयंत चौधरी हे एनडीएत सहभागी होणार असल्याच्या वृत्तांवर शिक्कामोर्तब झाल्याचं बोललं जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही वेळापूर्वी जयंत चौधरी यांचे आजोबा आणि भारताचे माजी पंतप्रधान दिवंगत चौधरी चरण सिंह यांना भारत रत्न दिला जाणार असल्याची घोषणा केली आहे. सरकारच्या या घोषणेनंतर रालोद प्रमुख जयंत चौधरी भावूक झाले. या पुरस्काराबद्दल जयंत चौधरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. रालोद सध्या समाजवादी पक्षाबरोबर आणि पर्यायाने इंडिया आघाडीबरोबर आहे. परंतु, गेल्या काही दिसांपासून ते भाजपाबरोबर घरोबा करतील आणि एनडीएत सहभागी होतील, अशा बातम्या येत होत्या. त्याबाबत विचारल्यावर जयंत चौधरी म्हणाले, आता कुठल्या तोंडाने मी नकार देऊ?
जयंत चौधरी म्हणाले, आज देशासाठी खूप महत्त्वाचा आणि मोठा दिवस आहे. मी खूप भावूक झालो आहे. या पुरस्काराबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे आभार मानतो. आपल्या पंतप्रधानांनी देशाची नस ओळखली आहे. देशात सर्व वर्गांतील लोकांचा, शेतकरी आणि कष्टकऱ्यांचा सन्मान केला जात आहे. दुसऱ्या कुठल्याही सरकारमध्ये असं काहीतरी करुन दाखवण्याची क्षमता नव्हती. मला आज माझे वडील अजित सिंह यांची खूप आठवण येतेय. युतीत आम्हाला किती जागा मिळतील याकडे मी लक्ष देणार नाही, तुम्हीही (प्रसारमाध्यमं) या गोष्टीकडे लक्ष देऊ नका. मी कुठल्या तोंडाने तो प्रस्ताव नाकारू? मी समाजमाध्यमांवरील माझी कुठलीही पोस्ट डिलीट करणार नाही. जशी राजकीय परिस्थिती असेल त्यानुसार मी माझं मत मांडत राहीन.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपा आणि रालोदची युती पक्की झाली आहे. केवळ त्याबाबतची अधिकृत घोषणा होणं बाकी आहे. रालोद हा पक्ष उत्तर प्रदेशात लोकसभेच्या दोन जागा लढवू शकतो. त्याचबरोबर रालोदला राज्यसभेची एक जागा दिली जाऊ शकते. पुढच्या दोन ते तीन दिवसांमध्ये दोन्ही पक्षांच्या युतीची घोषणा होऊ शकते.
इंडिया आघाडीतले पक्ष सातत्याने दावा करत होते की, जयंत चौधरी यांचा राष्ट्रीय लोक दल हा पक्ष त्यांच्या आघाडीचाच एक भाग आहे. जयंत चौधरी इंडिया आघाडी सोडून कुठेही जाणार नाहीत. आम्ही सर्व पक्ष मिळून आगामी लोकसभा निवडणूक एकत्रितपणे लढणार आहोत. इंडिया आघाडीतल्या नेत्यांच्या वक्तव्यांबाबत प्रश्न विचारल्यावर जयंत चौधरी यांनी मौन बाळगलं. जाता जाता जयंत चौधरी म्हणाले, मी माझे दोन्ही बाजूचे दरवाजे उघडे ठेवले आहेत.
तीन दिग्गजांना भारतरत्न
काँग्रेसचे नेते आणि भारताचे माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर करत असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (९ फेब्रुवारी) एक्स अकाऊंटवरून केली. त्यांच्यासह माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह आणि कृषी क्षेत्रात क्रांती घडविणारे डॉ. एम. एस. स्मामीनाथन यांनाही भारतरत्न पुरस्कार जाहीर केल्याची घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली. नरसिंह राव यांच्याबद्दल भावना व्यक्त करताना मोदी म्हणाले, माजी पंतप्रधान नरसिंह राव यांना भारतरत्न पुरस्काराची घोषणा करताना मला आनंद वाटत आहे.
हे ही वाचा >> Bharat Ratna Awards 2024 : माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव, चौधरी चरण सिंह आणि एम.एस. स्वामीनाथन यांना भारतरत्न जाहीर
चौधरी चरण सिंह यांच्याबद्दल मोदी काय म्हणाले?
माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांच्याबद्दल माहिती देताना पंतप्रधान नरेंद्रो मोदी म्हणाले, “चौधरी चरण सिंह यांनी दिलेल्या अतुलनीय योगदानाला हा पुरस्कार समर्पित करत आहोत. त्यांनी शेतकऱ्यांचे अधिकार आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आपले पूर्ण आयुष्य वेचले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असो किंवा देशाचे गृहमंत्री किंवा साधे आमदार असतानाही त्यांनी केवळ राष्ट्र निर्माणाला महत्त्व दिले. आणीबाणीच्या विरोधातही त्यांनी ठाम भूमिका घेतली होती. आमच्या शेतकरी बांधवांसाठी त्यांची समर्पण वृत्ती आणि आणीबाणीच्या काळात त्यांनी लोकशाही वाचविण्यासाठी दाखविलेली तत्परता आम्हाला कायम प्रेरणा देत राहिल.”