२४ पुरस्कारांपैकी निम्मे पुरस्कार कवींना
साहित्यनिर्मितीत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या ‘साहित्य अकादमी पुरस्कारां’ची गुरुवारी घोषणा करण्यात आली. यंदाच्या या २४ पुरस्कारांपैकी निम्मे म्हणजे १२ पुरस्कार विविध भाषेतील कवींनी पटकावले, हे विशेष. या पुरस्कारार्थीमध्ये दोन मराठी लेखकांचा समावेश असून जयंत पवार यांच्या ‘फिनिक्सच्या राखेतून उठला मोर’ या कथासंग्रहाला, तर शारदा साठे यांनी अनुवादित केलेल्या ‘पांथस्थ- एका भारतीय साम्यवादी नेत्याची मुशाफिरी’ला पुरस्कार घोषित झाले. एक लाख रुपये, शाल आणि ताम्रपट असे या पुरस्काराचे स्वरूप आहे, तर उत्कृष्ट अनुवादकांना पन्नास हजार रुपये, शाल आणि ताम्रपटाने गौरवण्यात येईल.
२४ प्रादेशिक भाषांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या परीक्षकांनी साहित्य अकादमीच्या कार्यकारी मंडळाला यंदाच्या २४ पुरस्कारार्थीची नावे सुचवली. साहित्य अकादमीचे अध्यक्ष डॉ. विश्वनाथप्रसाद तिवारी यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी येथे झालेल्या बैठकीत या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले. नवी दिल्लीत १८ फेब्रुवारीला होणाऱ्या एका विशेष कार्यक्रमात या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. उत्कृष्ट अनुवादासाठी देण्यात आलेल्या पुरस्कारांचे वितरण ऑगस्ट २०१३मध्ये होणार आहे.     

Story img Loader