गुजरातमधील भाजपाचे माजी आमदार जयंती भानुशाली यांची धावत्या ट्रेनमध्ये हत्या करण्यात आली. मंगळवारी रात्री उशिरा ही धक्कादायक घटना घडली. जयंती भानुशाली सयाजी नगरी ट्रेनमधून भुजहून अहमदाबादला चालले होते. त्यावेळी ही घटना घडली.
ट्रेन मालिया येथे पोहोचली असता आरोपींनी एसी डब्ब्यात घुसून भानुशाली यांच्यावर गोळया झाडल्या. त्यांचा जागीच मृत्यू झाला. भानुशाली गुजरात भाजपाचे माजी उपाध्यक्ष होते तसेच ते कच्छच्या अबडसा विधानसभा मतदारसंघातून २००७ ते २०१२ दरम्यान आमदारही होते.
Gujarat: Former BJP MLA Jayantilal Bhanushali was shot dead by unknown assailants onboard Sayji Nagri Express between Kataria-Surbari stations, last night; Police investigation underway
— ANI (@ANI) January 8, 2019
जयंती भानुशाली यांच्यावर मागच्यावर्षी एका महिलेने बलात्काराचा आरोप केला होता. त्यानंतर त्यांनी गुजरात भाजपा उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. माझ्यावर झालेला आरोप हा माझी प्रतिमा मलिन करण्याच्या कटाचा भाग आहे असे भानुशाली यांचे म्हणणे होते. आपल्यावर करण्यात आलेल्या आरोपाला कुठलाही आधार नाही असे सांगत त्यांनी बलात्काराचा आरोप फेटाळून लावला होता. गुजरातमध्ये अशा प्रकारे ट्रेनमध्ये घुसून एका नेत्याची हत्या होणे गंभीर बाब आहे. त्यामुळे ट्रेनमधून प्रवासाच्या सुरक्षिततेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.