प्रसिद्ध अभिनेत्री व समाजवादी पक्षाच्या खासदार जयाप्रदा काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. सध्या उत्तर प्रदेशातील रामपूर लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या जयाप्रदा यांनी आंध्र प्रदेशात परतण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या आठवडय़ात त्यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची सविस्तर भेट घेतल्याने त्यांचा काँग्रेसप्रवेश निश्चित मानला जात आहे.
आंध्र प्रदेशच्या राजकारणात मी परतत असून त्यासाठी कोणत्या पक्षात जायचे याचा निर्णय लवकरच घेईन, त्याची रीतसर घोषणाही केली जाईल, असे त्यांनी येथे सांगितले. त्या आपले मूळ गाव असलेल्या राजामुंद्री लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक असून सध्या या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व काँग्रेसचे वुंदावल्ली अरुणकुमार हे करत आहेत. विशेष म्हणजे, जयाप्रदांना हा मतदारसंघ हवा असल्यास काँग्रेसच्या निष्ठावान सैनिकाच्या नात्याने मी त्यांच्यासाठी ही जागा सोडण्यास तयार आहे, अशी घोषणाही अरुणकुमार यांनी केली आहे. या घडामोडींमुळे जयाप्रदा यांच्या काँग्रेसप्रवेशाच्या शक्यतेला पुष्टी मिळत आहे.